महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Women Harassed Job In Abroad : सावधान! चांगल्या पगारासाठी विदेशात जाण्याचं स्वप्न बघताय, तर त्या अगोदर 'ही' बातमी नक्की वाचा...

Women Harassed Job In Abroad : विदेशात चांगल्या पगाराची नोकरी, हे अनेकांचं स्वप्न असतं. पण, अनेकदा यावरून आपली फसवणूक देखील होऊ शकते. त्यामुळं सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आलीय. त्याबाबत जाणून घेऊ या.

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 8:11 PM IST

Women Harassed Job In Abroad
परदेशात नोकरीसाठी महिलांचा छळ

पोलीस अधिकारी आणि रूपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया

पुणे Women Harassed Job In Abroad : भारतात चांगलं शिक्षण घेतल्यावर अनेक तरुण तरुणी नोकरीच्या निमित्तानं विदेशात जातात. त्यांना तिथं चांगला पगारही मिळतो. तसंच काही कमी शिकलेली किंवा काहीही न शिकलेले लोक देखील कामानिमित्त विदेशात जातात. तिथं नोकरी करून चांगले पैसे घेऊन पुन्हा भारतात येतात. पण गेल्या काही वर्षात एजंटकडून याबाबतीत फसवणूक होतेय. त्या फसवणुकीला बळी पडल्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येतेय. पुण्यातही अशीच एक घटना घडलीय. पुण्यातील मार्केटयार्ड येथे राहणाऱ्या तीन महिलांना चांगला पगार देतो, असं सांगत आखाती देशात नेवून तेथे त्यांना डांबून ठेवत त्यांचा छळ केल्याची घटना घडलीय.


नोकरीचं आमिष दाखवून केला छळ :नोकरीचं आमिष आणि चांगला पगार देणार, असं सांगून पुण्यातील मार्केटयार्ड येथील तीन महिलांना आखाती देशात नेलं. तेथे त्यांना डांबून ठेवत त्यांचा छळ केलाय. याप्रकरणी पुण्याच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानं मुंबईतील माहिममधून मुख्य आरोपीला अटक केलीय. मोहम्मद फैयाज अहमद याहया (28, रा. ओशिवरा. मूळ रा. कर्नाटक) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तर त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येतोय. याबाबत दोन महिलांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आरोपीला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. याप्रकरणी नसरीन भाभी, अब्दुल हमीद शेख, शामिमा खान आणि हकीम या एजंट विरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरूय.


आखाती देशात नोकरी :याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार लता मोहिते आणि सीमा मोहिते या दोन्ही मार्केटयार्ड परिसरात काम करतात. त्यांच्याजवळ राहणाऱ्या एजंट नसरीन भाभी फोनवर विदेशात म्हणजेच आखाती देशात नोकरीबाबत बोलत होत्या. तेव्हा मोहिते यांनी त्यांना नोकरीसाठी विचारले. दोन दिवसांनी परत घरी येऊन त्यांनी मोहितेंचा पासपोर्ट घेतला आणि सांगितलं की, तुम्हाला चांगला पगार मिळेल. सांगेल तेव्हा मेडिकलला यावं लागेल. आर्थिक अडचणीत असलेल्या या दोन्ही महिलांनी विचार केला. जवळपास दोन ते तीन महिन्यांनी नसरीन भाभी या त्यांना मुंबईला मेडिकलसाठी घेऊन गेल्या. तिथं परत एका एजंटशी भेट घालून दिली. त्यानंतर त्यांना केरळला रेल्वेनं पाठवण्यात आलं. तिथं देखील दुसरा एजंट भेटला. तेथून मग मस्कदला पाठवण्यात आलं. तिथं देखील अजून एक एजंट भेटला. तेथून आम्हाला रियाधला पाठवण्यात आलं, असं मोहितेंनी सांगितलंय.


सौदी अरेबियातील व्यक्तीला विक्री :पुढे असं झालं की, या दोघींना माहिती देण्यात आलेला मालक घ्यायला न येता, दुसरा एकजण घ्यायला रियाधला आला. तो यांना फोटो दाखवून मालकाच्या घरी घेऊन गेला. या दोघींना त्या मालकाच्या 7 मुली आणि 4 मुलांचं काम करावं लागत होतं. कामात थोडा वेळ जरी विश्रांती घेतली, तरी त्यांना मारहाण केली जात होती. त्यांना दिवसभर उपाशी देखील ठेवण्यात येत होतं. विरोध केल्यास त्यांना परत मारहाण केली जात होती. महिना झाला तरी त्यांना पगार मिळाला नाही, असा प्रकार 4 ते 5 महिने सुरू होता. तेव्हा लक्षात आलं की, या एजंटनी आम्हाला सौदी अरेबियातील व्यक्तीला चार लाख रुपयांत विकलंय, असं यावेळी लता मोहिते यांनी सांगितलंय.


मोठ्या प्रमाणावर अन्याय : त्या पुढे म्हणाल्या की, तिथं असताना मोठ्या प्रमाणावर अन्याय सहन करावे लागत होते. एवढ्या लोकांचं काम करूनही मारहाण, कोंडून ठेवणं, पगार न देणं हे प्रकार सुरू होते. तेव्हा मोबाईल वापरत असताना फेसबुकवर योगेश चंदन यांना फॉलो केलं. त्यांच्याकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा नंबर घेतला. त्यांच्याशी बोलून तेथील परिस्थिती सांगण्यात आली. तसंच त्यावेळेस रुपाली चाकणकर यांनी व्हिडियो कॉल करून तेथील परिस्थिती देखील बघितली. मग तेथील भारतीय एम्बिसीमध्ये जायला सांगितलं. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आमची सुटका झाली, असं मोहितेंनी सांगितलं.



पूर्ण खात्री करा :तेथे महिलाच नाही तर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याच पद्धतीनं फसवणूक करून पाठवलं जातं. आमचं लोकांना आवाहन आहे की, आमच्यासोबत जे घडलंय ते खूपच भयावह आहे. तुम्ही मात्र नक्की कुठे जाणार आहोत याची पूर्ण खात्री करा. काय काम आहे, पगार किती देणार आहे, खरचं हे लोक काम देतात की माणसं विकतात हे पाहायला पाहिजे, असं त्या म्हणाल्या.



तक्रारींची दखल :याबाबत गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले की, आमच्याकडे जेव्हा या दोन महिलांच्या तक्रारी मिळाल्या, तेव्हा आम्ही लगेच याची दखल घेतली. यात 4 आरोपींना अटक केलीय. तसंच अधिक तपास सुरू आहे. यातील दोन आरोपी हे मुंबई, तर दोन आरोपी हे पुण्याचे आहेत. या महिलांना टुरिस्ट व्हिझावर तिथं पाठवलं जातं होतं. त्यांचा व्हिझा आणि पासपोर्ट घेऊन त्यांना परत येण्यासाठी अडकवलं जातं होतं.


महिलांची सुटका :याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, जेव्हा त्या महिलांनी आमच्याशी संपर्क केला, तेव्हा आम्ही त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करायला सुरवात केली. जवळपास 3 महिने एम्बीसीशी मेलवर संपर्क साधत त्यांना तेथील परिस्थिती सांगण्यात आली. 8 दिवसांपूर्वी त्यांची सुटका झालीय. या तिन्ही महिला पुण्याच्या आहेत. मानवी तस्करी करून इतर देशात पाठवण्यात आलेल्या या महिलांची सुटका पुणे पोलीस तसंच राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नानं झालीय. ही संपूर्ण घटना भयानक आहे. योग्य ती कारवाई केली जाईल, असं कोणीही त्या ठिकाणी अडकून असेल तर आयोग नक्की मदत करेल, अशी माहिती चाकणकर यांनी दिलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details