पुणे Water Supply by Tanker in Pune : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभर झालेल्या मुसळधार पावसानंतर ऑगस्ट महिन्यात पावसानं हुलकावणी दिलीय. राज्यातील अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय. पुणे जिल्ह्यात अनेक गावात पिण्याच्या पाण्याचं प्रश्न निर्माण झालाय. उन्हाळ्यात जेवढे टँकर जिल्हाभर लागत होते, तेवढ्याच टँकरची गरज आता पावसाळ्यात आहे. यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी 44 टँकरने पुरवठा होत होता. तेच चित्र पावसाळ्यात दिसून येतंय. सप्टेंबर महिना उजाडलाय, तरीही जिल्ह्यात 44 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय.
'अशी' आहे पावसाची परिस्थिती :याबाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी माहिती दिली की, पुणे जिल्ह्यात जून, जुलै, आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पर्जन्यमानाचा आढावा घेतला तर, जिल्ह्यात जून महिन्यात 51 टक्के पाऊस झालाय. जुलै महिन्यात 91 टक्के पाऊस झालाय. ऑगस्ट महिन्यात केवळ 40 टक्के पाऊस झालाय. एकूणच मागच्या वर्षाची तुलना केली तर ऑगस्ट महिन्यात 115 टक्के एवढं पाऊस झाला होता. जुलै महिन्यात 145 टक्के एवढा पाऊस झाला होता. यंदा खूप मोठा फरक जून आणि ऑगस्ट महिन्यात पडलाय. 100 महसूल मंडळापैकी 25 महसूल मंडळात कमी पाऊस झाला असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
धरण साठ्यातील पाणी :तसंच ते पुढे म्हणाले की, कमी झालेल्या पावसामुळे धरण साखळीत देखील पाणी कमी असल्याचं चित्र आहे. एकूणच मुठा खोऱ्यातील धरणांत 27 टीएमसी एवढा साठा आहे. मागच्या वेळी 29 टीएमसी एवढा साठा होता. तर निरा खोऱ्यातील धरण साखळीत 43 टीएमसी एवढा साठा आहे. तर मागच्या वर्षी 48 टीएमसी एवढा साठा होता. तसेच कुकडी खोऱ्यात यंदा 23 टीएमसी एवढा साठा आहे. तर, मागच्या वर्षी 31 टीएमसी एवढा साठा होता. मुठा खोरे सोडलं तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा इतर धरणात कमी प्रमाणात पाण्याचा साठा असल्याचं देशमुख म्हणाले.