महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर वेदीकाला मिळाले जीवनदान; 16 कोटींचे दिले इंजेक्शन

वेदिका सौरभ शिंदे ही एसएमएस टाईप १ (SMA TYPE 1) या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती. तीला काल (बुधवार) पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात अमेरिकेतून मागवण्यात आलेले 16 कोटींचे इंजेक्शन देण्यात आले आहे. लोकनिधीतून ही रक्कम जमा करण्यात आली आहे.

वेदिकाला दिली लस
वेदिकाला दिली लस

By

Published : Jun 17, 2021, 7:33 AM IST

पिंपरी-चिंचवड- दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या अकरा महिन्याच्या वेदीकाला काल (बुधवार) पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात अमेरिकेतून मागवण्यात आलेले 16 कोटींचे इंजेक्शन देण्यात आले आहे. क्राऊड फंडिंगद्वारे हे पैसे जमा करण्यासाठी वेदिकाच्या आई-वडिलांनी जीवाचे रान केले होते. वेदीकाला वेळेत इंजेक्शन मिळाल्याने आई वडील आनंदी असून अवघ्या महाराष्ट्रासह देशाचे आभार मानले आहेत.

वेदीकाची प्रकृती स्थिर

वेदिका सौरभ शिंदे ही एसएमएस टाईप १ (SMA TYPE 1) या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती. तिला झोलगेन्स्मा (Zolgensma) हे इंजेक्शन अमेरिकेतून आयात करण्यात आली. वेदिकाला दोन दिवसांपूर्वी हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले. त्यानंतर सर्व गरजेच्या चाचण्या डॉक्टरांनी केल्या. त्यानंतर इंजेक्शन देण्यात आली. वेदीकाची प्रकृती स्थिर असून वन टाईम जिनथेरेपी असल्याने सिंगल डोस इंजेक्शन दिले जाणार आहे, अशी माहिती वेदीकाचे वडील सौरभ यांनी दिली आहे.

लोकनिधी व सीएसआर मार्फत जमा केले १६ कोटी रुपये

वेदिका अवघ्या ८ महिन्यांची असताना तिला एसएमएस टाईप १ (SMA TYPE 1) हा दुर्मिळ आजार झाला असल्याचे निदर्शनास आले. या आजारावर झोलगेन्स्मा (Zolgensma) हे इंजेक्शन देणे गरजेचे होते, त्याप्रमाणे एका सामान्य कुटुंबातील वेदिकाचे वडील सौरभ आणि स्नेहा शिंदे यांनी जीवाचे रान करून तब्बल १६ कोटी रुपये लोकनिधी व सीएसआर मार्फत जमा केले. प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली. सर्व जनतेने आशीर्वाद दिले या सगळ्यांच्या कष्टाचे आज फळ मिळाले आणि वेदिकला लस भेटली अशा भावना वेदिका च्या पालकांनी व्यक्त केली.

देश-विदेशातून वेदिकासाठी मदतीचा हात

'एक खूप अशक्य वाटणारी लढाई शक्य झाली. याचे सर्व श्रेय दात्यांना तसेच ज्यांनी ज्यांनी ज्या प्रकारे मदत करता येईल त्या प्रकारे मदत केली, अशा सर्व व्यक्तींचे उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर व त्यांचे सहकारी या सर्वांचे शिंदे कुटुंब शतशः ऋणी राहील. माणुसकी अजूनही जिवंत आहे. हेच या १६ कोटींच्या लढाईतून सिद्ध झाले आहे', असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार, अनेक राजकीय मंडळी, पत्रकार तसेच देशातील जनतेबरोबर विदेशातून देखील वेदिकासाठी मदतीचा ओघ सुरू होता. असे देखील त्यांनी सांगितले आहे.

'आमदार, खासदारांनी केली मदत'

'खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विशेष प्रयत्न करून शक्य तितकी मदत केली. संसदेत अशा आजारांसाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी देखील केली. भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील यांनी सुरवातीपासून लस मिळेपर्यंत शिंदे कुटुंबासोबत उभे राहून लागेल ती मदत केली', असे देखील शिंदे कुटुंबीयांनी आवर्जून सांगितले.

लसीवरील आयातशुल्क व कर माफ

लसीवरील आयात शुल्क माफ करण्याकरिता वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य भवन विभागाशी व केंद्रीय वित्त मंत्रालयाबरोबर पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेवुन केंद्र सरकारने आयातशुल्क व कर माफ केला आहे. यासाठी सिने-अभिनेते निलेश दिवेकर अणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे सचिव संकेत भोंडवे यांचे योगदान मोलाचे होते, अशी माहिती वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा -राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

ABOUT THE AUTHOR

...view details