पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवडमधील 170 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पोलिसांनी सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दहा लाख रुपये किंमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने, 2 लाख 60 हजारांच्या दुचाकी, असा एकूण 12 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खंडणी विरोधी पथक आणि चिंचवड पोलिसांच्या सयुंक्त पथकाने ही कामगिरी केल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. याप्रकरणी प्रभाकर येमनप्पा दोडमणी (वय 26 वर्षे, रा. आनंदनगर, चिंचवड) व अल्ताफ सलीम शेख (वय 19 वर्षे, रा. हांडेवाडी, हडपसर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना चोरटे करत होते लक्ष्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून मॉर्निंग वॉक करणाऱ्या एकट्या महिलांना लक्ष्य करून काही चोरटे सोनसाखळी हिसकावत असल्याचे गुन्हे घडले होते. त्याचा तपास करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ यांनी त्यांचे तीन आणि चिंचवडचे एक, अशी चार पथके तयार केली होती.
सापळा रचून आरोपींना केली अटक
चारही पथके माहिती संकलित करत असताना पोलीस नाईक आशिष बोटके आणि स्वप्नील शेलार यांना माहिती मिळाली की, आरोपी आकुर्डी, निगडी, पिंपरी, चिंचवड परिसरात फिरत आहेत. त्यानुसार पोलीसांनी सापळा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींनी सुरुवातीला चिंचवड येथे दूध खरेदीसाठी आलेल्या एकाच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली. मात्र, त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी शहरात एकूण 15 ठिकाणी चेन हिसकावली आणि पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली.