महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पश्चिम महाराष्ट्रात शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला

शेतीच्या कामांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर आणि अन्य उपकरणांचा वापर अलीकडच्या काळात वाढला असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

By

Published : Apr 28, 2019, 8:06 AM IST

पश्चिम महाराष्ट्रात शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला

पुणे - पश्चिम महाराष्ट्रात शेतीकामासाठी ट्रॅक्टरच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. सन २०१८-२०१९ मध्ये पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील ५ प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ९२४२ ट्रॅक्टरची नोंदणी झाली आहे. ही संख्या सन २०१६-२०१७ च्या तुलनेत ३२०० हून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये पुणे विभागातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येत शहरीकरणामुळे लक्षणीय वाढ झालेली आहे. मात्र, ग्रामीण भागात शेती आणि वाहतुकीच्या अन्य कामांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ट्रॅक्टरच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आहे. पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत असणाऱ्या बारामती, पिंपरी-चिंचवड, अकलूज अणि सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये सन २०१६-२०१७ मध्ये ६०६० तर २०१७-२०१८ मध्ये ८२७७ आणि २०१८-२०१९ मध्ये ९ हजार २४२ ट्रॅक्टरची नोंदणी करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला
सन २०१८-२०१९ मध्ये झालेल्या ट्रॅक्टरच्या नोंदणीनुसार, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये १२००, पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयामध्ये १३२५, बारामतीमध्ये १६६७, सोलापूरमध्ये २८५० आणि अकलूजमध्ये २२०० ट्रॅक्टरची नोंदणी करण्यात आली आहे.

तज्ञांच्या मते, पश्चिम महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच ग्रामीण भागात शेतीच्या व्यतिरिक्त पाण्याच्या टँकरची वाहतूक आणि अन्य महत्त्वाच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा प्रभावीपणे उपयोग केला जातो. दरम्यान, शेतीच्या कामांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर आणि अन्य उपकरणांचा वापर अलीकडच्या काळात वाढला असल्याचेही तज्ञांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details