पुणे -डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर तरुणांना भेटण्यासाठी बोलावून त्यांना लुबाडणाऱ्या एका तरुणीची पुणे शहरात दहशत पसरली आहे. या तरुणीने आतापर्यंत दोन तरुणांना लॉजमध्ये भेटण्यासाठी बोलावून त्यांना गुंगीचे औषध दिल्यानंतर त्यांच्याजवळील रोख रक्कम आणि इतर साहित्य घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी पुण्यातील वाकड आणि चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेत.
दारूमध्ये गुंगीचे औषध मिसळून केले बेशुद्ध -
आयटी इंजिनिअर असलेल्या एका तीस वर्षीय तरुणाने याबाबत तक्रार दिली आहे. हा तरुण मूळचा श्रीरामपूर येथील असून पुण्यामध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये या तरुणीची आणि या तरुणाची डेटिंग ॲप वर ओळख झाली होती. याच ओळखीतून संबंधित तरुणीने या तरुणाला खराडी परिसरातील एका लॉजवर भेटण्यासाठी बोलावले. तिथे भेटल्यानंतर दोघेजण दारू पिणार होते. परंतु आरोपी तरुणीने दारूमध्ये गुंगीचे औषध मिसळून त्याला दिले. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेत तिने पोबारा केला. इतके दिवस या त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्याने तक्रार दिली नव्हती. परंतु वाकड पोलीस ठाण्यांमध्ये अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाडस दाखवत याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.