पुणे - कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास केंद्राने त्यांच्याकडे ओढून घेतला आहे. आता हा तपास त्यांनी लवकरात-लवकर करावा, अशी आमची अपेक्षा आहे. राज्य सरकारनेच या प्रकरणात तपास करावा, अशीच माझी भूमिका होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना 'ओव्हर रूल' करण्याचा अधिकार आहे, असे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. गृहमंत्री अनिल देशमुख पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्राने हा तपास आपल्याकडे घेतला असला तरी या प्रकरणात 'एसआयटी' नेमता येते काय? याची चाचपणी महाधिवक्ता यांच्याकडे केली जात आहे. तसे करता येत असेल तर एसआयटीमार्फत समांतर चौकशी राज्य सरकार करेल, असे देशमुख म्हणाले. फोन टॅपिंग प्रकरणात निवडणुकीनंतर अनेक तक्रारी आल्या. याबाबत 2 अधिकाऱ्यांची समिती नेमली असून ती याची चौकशी करेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या सोबत भाजपच्याही काही नेत्यांनी आपले फोन टॅप झाल्याची तक्रार केली होती, त्याचीदेखील चौकशी होईल, असे देशमुख म्हणाले.
हेही वाचा -'मी माझ्या पक्षावर कधीही टीका केली नाही, पक्ष आणि मी एकरूप'