पुणे : कुठलाही सण उत्सव असला की, पूर्वी बँड बाजा वाजायचे. त्याचा आवाज ही कानाला झेपेल एवढा असायचा. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला आणि बाजारामध्ये डीजे आला. एडिटर डीजेमध्ये तरुणाई नाचून गाऊन आपला आनंद सादर करत असली, तरी याचा अनेक लोकांना त्रास होतो. शासनाकडून त्यासाठी डेसिबलची मर्यादासुद्धा दिली जाते. परंतु कित्येक वेळा डीजे हे मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण करून नागरिकांना त्रास देत असतात.
दहा लाख रुपयाचे नुकसान :असाच प्रकार पुण्यात घडला आहे. एका लग्न समारंभात जाऊन एका ज्येष्ठ नागरिकाने डीजेच्या आवाजाला कंटाळून डीजेचे वायर, मशीन्स, स्पीकर, तोडून टाकत तब्बल दहा लाख रुपयाचे नुकसान केले आहे. पुण्यातील कोंढवा खुर्दमध्ये बुधवारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक सत्यबिर बंगा यांच्या विरोधात अब्दुल रीसालदार याने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ८ ममार्च रोजी कोंढवा भागात असणाऱ्या, कोरियंटल रिसॉर्ट अँड क्लब या ठिकाणी एक विवाह सोहळा संपन्न होत होता.