पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य ( Governor Bhagat Singh Koshyari controversial statements ) केले होते. महापुरुषांबाबत राज्यपाल व राजकीय नेत्यांकडून सातत्याने होणारा अवमानाच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी संघटना व राजकीय पक्षांनी मंगळवारी पुकारलेल्या पुणे बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत हा बंद पुकारण्यात आला होता. यानंतर शहरातील सर्वच दुकाने सुरू झाले आहे.
सकाळी 7 ते 3 वाजेच्या दरम्यान बंद : शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही देखील बंद कडकडीत पाळण्यात आले होते. बाजारपेठा, महात्मा फुले मंडई, मार्केट यार्ड अशी महत्वाच्या ठिकाणीही व्यापारी, व्यावसायिकांनी आपली दुकाने, गाळे व व्यवसाय बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदविला. तर नेहमी बंदच्यावेळी सुरु राहणारे हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, स्वीट होम्स, डेअरी, खानावळी अशा व्यावसायिकांनी देखील आपले व्यवसाय बंद ठेवून बंदमध्ये आपला सहभाग नोंदविला. सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. दुपारी तीन वाजल्यानंतर व्यावसायिकांनी हळूहळू त्यांची दुकाने, कार्यालये, कंपन्या,हॉटेल सुरू केल्या.