पुणे : दोन दिवसापूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत दिवसा हातात कोयता घेऊन मुलीच्या मागे धावत एका तरुणाने त्या तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेच्या वेळेस दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता त्या कोयता घेऊन हल्ला करणाऱ्या तरुणाला पकडले. तेव्हा जवळच असलेल्या पेरुगेट पोलीस स्टेशनमध्ये एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. स्थानिकांनी फोन केल्यावर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. या घटनेने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. आत्ता या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाणे अंतर्गत पेरूगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
तीन कर्मचारी निलंबित :विश्रामबाग पोलिस ठाणे अंतर्गत पेरूगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली.