पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची प्रतिक्रिया पुणे :पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत आहे. मात्र पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही संभ्रमात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यावरुन आज पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन बैठका झाल्या. एक शहर राष्ट्रवादीची आणि दुसरी जिल्हा राष्ट्रवादीची. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाध्यक्ष शरद पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही. आपली अवस्था महाभारतातील अभिमन्यूसारखी झाली आहे, असे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले आहे.
तालुकाप्रमुख गोंधळले :राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंड केल्यानंतर अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह चिन्हावर दावा केला आहे. यानंतर आज पुण्यात शहर, जिल्ह्याची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने तालुकाप्रमुख गोंधळले पाहायला मिळाले.
कार्यकर्त्यांची अवस्था अभिमन्यूसारखी :याबाबत प्रदीप गारटकर म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांची अवस्था महाभारतातील अभिमन्यूसारखी झाली आहे. एकीकडे शरद पवार भगवान कृष्णाच्या भूमिकेत आहेत, तर अजित पवार अर्जुनाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे आपली अवस्था महाभारतातील अभिमन्यूसारखी झाली आहे. आपण एका चक्रात अडकलो आहोत. शहरातच निर्णय होत असल्याने तो जिल्ह्यात होऊ शकत नाही. तालुकाप्रमुख त्यांच्या स्तरावर बैठक घेऊन आपली भुमीका ठरवू शकतात. प्रत्येकाची मते वेगळी असल्याने निर्णय घेण्यात आडचणी येत असल्याचे ते म्हणाले. तसेच सर्वांना जिल्हा स्तरावरील निर्णय मान्य असेलच असे नाही. यावरु कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा गोंधळ पहायला मिळत आहे.
शरद पवारांची बंडखोरांवर कारवाई : अजित पवारांची बंडखोरी आणि सरकारमधील सहभागानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांनी बंडखोर सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना निलंबित केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. सोमवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आवाड, जयंत पाटील यांची हकालपट्टी केल्याचे स्पष्ट केले. मात्र सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना पत्र लिहिल्यानंतर शरद पवार चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis Update : अजित पवारांनी सर्व खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांची 5 जुलैला बोलावली बैठक