पुणे- शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीद्वारे कारवाई करण्यात येत आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या मोबाईलवर दंडाच्या रक्कमेची पावती वाहतूक पोलिसांच्यावतीने पाठवली जाते. परंतु अनेक वाहनचालक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशाप्रकारचा दंड वसूल करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. अशाच एका फॉर्च्युनर चालकाकडून लष्कर वाहतूक पोलिसांनी चक्क २४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
हवालदारानं दाखवला कायद्याचा बडगा; पुण्यात फॉर्च्युनर चालकाकडून २४ हजार दंड वसूल
एका फॉर्च्युनर चालकाकडून लष्कर वाहतूक पोलिसांनी चक्क २४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
वाहतूक शाखेने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. चौकाचौकात नाकाबंदी करून ई-चलन मशिनवर वाहनचालकांकडील थकीत दंडाची रक्कम तपासली जात आहे. एखाद्या वाहन चालकाने दंडाची रक्कम भरली नसेल तर त्याच्याकडून संपूर्ण दंड वसूल करण्यात येत आहे. लष्कर वाहतूक विभागातील पोलीस हवालदार मार्तंड जगताप यांनी गुरुवारी दुपारी नाकाबंदीत एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाला थांबवून माहिती घेतली. त्यावेळी त्या गाडीने पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर तब्बल २४ वेळा स्पीड लिमिटचे उल्लंघन केल्याचे समोर आले.
याप्रकरणी प्रत्येक वेळी एक-एक हजार रुपये असा २४ हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. मात्र, ती रक्कम संबंधित गाडी चालकाने अद्याप भरली नव्हती. त्यामुळे ही संपुर्ण रक्कम त्याच्याकडून वसूल करण्यात आली आहे.