बारामती- सर्वसामान्य नागरिकांची हक्काची गाडी म्हणून लालपरीची म्हणजे एसटी बसची ओळख आहे. महाराष्ट्रात कोठेही सुखरूप प्रवास करायचा झाल्यास नागरिक लाल परीलाच सर्वाधिक पसंती देत असतात. बहुतांशी प्रवासी एसटीनेच प्रवास करतात. मात्र सध्या लालपरीचा प्रवास धोकादायक झाल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. सातारा आगरात झालेल्या अग्नी दुर्घटनेनंतर ईटीव्ही भारतने बारामती आगराची पाहणी केली, त्यावेळी एसटी महामंडळात अग्नीसुरक्षेच्या उपाययोजनांसह इतर सुरक्षेच्या सोयीसुविधांचे बारा वाजल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सध्या महाराष्ट्रात आगीच्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये सातारा आगरात झालेल्या अग्नी दुर्घटनेत एसटी महामंडळाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. यात पाच शिवशाही बसेस जळून खाक झाल्या होत्या. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रत्येक आगाराने आगीची दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करून व त्याच्या नियमित देखभालीकडे लक्ष पुरवणे गरजेचे असल्याचे बारामतीच्या आगाराची पाहणी केल्यानंतर समोर आले आहे.
बारामती एसटी आगार घेणार का धडा ? सुविधांकडे दुर्लक्ष-बारामती आगारातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस मध्ये प्रथमोपचार पेट्या, अग्निरोधक सिलेंडर गायब झाल्याचे दिसून येत आहे. काही बसमध्ये कालबाह्य अग्निरोधक सिलेंडर उपलब्ध असल्याचे दिसून आले. प्रवाशांच्या सुखकर प्रवासाची हमी देणाऱ्या महामंडळाच्या अनेक बस मोडकळीस आले आहेत. आधी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय वाढली आहे. त्यामुळे एसटीच्या सुरक्षित प्रवासाबाबत प्रवाशांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. प्रत्येक बसमध्ये नियमानुसार ज्या सुविधा देणे आवश्यक आहे. त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मात्र ज्या बसमध्ये काही त्रुटी असतील त्या लवकरच दूर केल्या जातील अशी, माहिती बारामती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली.
प्रवास रामभरोसे-बारामती तालुका राज्यात ग्रामीण विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून ओळखले जातो. बारामती आगारातून दादर, मुंबई, धुळे, हैदराबाद, शेगाव, जालना, माजलगाव, ठाणे, लातूर, तुळजापूर, नाशिक, अक्कलकोट, बीड, कोल्हापूरसह आदी विविध मार्गावर बसेस धावतात. मात्र प्रवासादरम्यान अचानक निर्माण होणाऱ्या आपत्कालीन काळात एसटीबसमध्ये पुरेशा सोयी उपलब्ध नसल्याने प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. परिवहन विभागाच्या नियमानुसार बसमध्ये सर्व अत्यावश्यक गोष्टींसह प्रथमोपचार पेटी ठेवणे बंधनकारक आहे. अचानक बसमध्ये आग लागल्यास बचावासाठी अग्निरोधक सिलेंडर असणे गरजेचे असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अग्निरोधक सिलेंडर --लालपरीचा प्रवास धोकादायक एसटी बसची दुरवस्था.....ग्रामीण भागातील मार्गावर फेर्या मारणार्या अनेक शटल बसेस खिळखिळ्या झाल्या असून त्यात तुटलेल्या खिडक्या, आसन व्यवस्थेवरील स्पंज गायब, चालक-वाहकाजवळील दरवाजाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे तातडीने या संदर्भात योग्य पद्धतीने नियोजन करण्याची गरज असल्याचे आगार प्रमुखांकडून सांगण्यात येत आहे.