बारामती- मोटर सायकल व सोनसाखळी चोऱ्यांना आळा घालण्यासाठी बारामती शहराच्या चौबाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी घेतला आहे. हे कॅमेरे लोकसहभागातून बसवले जाणार असून, याचे समन्वयन शहर पोलीस ठाण्यातून केले जाणार आहे.
चोरीच्या घटनेत वाढ-
बारामतीत मागील काही दिवसांपासून दुचाकी गाड्या व सोनसाखळ्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. या चोऱ्या रोखण्याच्या दृष्टीने लोकसहभागातून शहरातील मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. बऱ्याचदा दुचाकी व सोनसाखळी चोरणारे चोरटे बाहेरून येऊन बारामतीत चोऱ्या करतात व निघून जातात. त्यामुळे त्यांचा शोध घेणे बर्याचदा अवघड होते. आता कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोरट्यांना पकडणे सहज शक्य होणार आहे.
प्रत्येक वाहनांवर राहणार नजर-
चोर दुचाकी चोरल्यानंतर त्या शहराबाहेर घेऊन जातात. एवढेच नाही तर सोनसाखळ्या चोर बाहेरून येऊन शहरात चोऱ्या करतात. त्यामुळे त्यांना शोधणे अवघड होते. यावर आळा घालण्यासाठी शहराला जोडणाऱ्या दौंड, इंदापूर, मोरगाव, भिगवण, फलटण,निरा या रस्त्यांवर उच्च दर्जाचे नाईट व्हिजन कॅमेरे बसवले जाणार आहेत. या कॅमेऱ्यामधून गडद अंधारातही प्रत्येक वाहनाची नंबर प्लेट अचूकपणे ओळखण्याची क्षमता असणार. त्यामुळे चोराला पकडण्यास मदत होणार आहे.