बारामती - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. 80 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 'ईटीव्ही भारत'ने यानिमित्ताने पवार यांनी बारामतीसाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला आहे. वाचा हा विशेष वृत्तांत...
जैवशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान, कृषी संशोधन व फलोत्पादन, कृषी औद्योगिक, सामाजिक क्रांती या विषयांना आंतरराष्ट्रीय पातळीवर खूपच महत्त्व आले आहे. या क्षेत्रातदेखील आपल्या तालुक्यातील विद्यार्थी मागे राहू नयेत, त्यांनादेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्ञान ग्रामीण भागातच मिळावे, असा विचार करून शैक्षणिक कार्य हाती घेऊन ते तडीस नेणारा राज्यातील एकमेव नेता म्हणून शरद पवार यांचा उल्लेख करावा लागेल.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हणून संबोधले जाते. परंतु, पुण्याच्या तोडीच्या शिक्षणसंस्था बारामतीसारख्या ग्रामीण भागातही उभ्या करून पुणे शहराप्रमाणेच बारामतीला शरद पवारांनी विद्यानगरी केले. आता पुण्याप्रमाणेच बारामतीलाही विद्येचे माहेरघर म्हटले जावू लागले आहे. विद्यानगरीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सोयीसुविधा व अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जगाच्या स्पर्धेत आणण्याचे मोठे कार्य पवारांनी केले आहे. राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तांत्रिक प्रगती, लोकसंख्या, धान्योत्पादन व उत्पन्नाबरोबर सुबत्ता याबाबत केलेली भाकिते दिवसेंदिवस बदलत गेली. आधुनिक जगतात नवनवीन तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले, अगदी साधे उदाहरण सांगायचे तर आजच्या पॉकेट कॅलक्युलेटरची गणनक्षमता ही 50 वर्षांपूर्वी तयार केलेल्या खोलीभर आकाराच्या आणि काही टन वजनाच्या पहिल्या कॉम्प्युटरपेक्षाही जास्त आहे. तंत्रज्ञानातील पुढील शतकातील वाटचाल ही वेगळीच असणार आहे. या तंत्रज्ञानाचे दूरगामी परिणाम समाजव्यवस्थेवर व आर्थिक व्यवस्थेवर होणार आहेत. यासर्व बाबींचा सारासार विचार करून केवळ राजकारण न करता समाजकारण हे राजकारणापेक्षाही महत्त्वाचे आहे, हे ओळखून पवारांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षण संस्था उभ्या केल्या व भविष्यातील गरजा ओळखून शिक्षणात आपला भाग मागे राहू नये याची काळजी घेतली आहे. शरद पवार विदेशी पाहुण्यांसह... शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान जमीन, संपत्ती यावरून ग्रामीण भागात श्रीमंती ठरवली जात होती. परंतु सध्याच्या काळात हे सर्व कालबाह्य ठरून संपत्तीची निर्मितीही ज्ञानावरच आधारित असल्याने शैक्षणिक श्रीमंती महत्त्वाची आहे, या विचारातून शरद पवारांनी केवळ बारामतीतच नव्हे तर जिल्हा, राज्यात शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानामुळे आपल्या उत्पन्नाच्या आणि वस्तू व सेवा विनिमयाच्या पद्धती बदलू लागल्या आहेत. त्यामुळे श्रीमंत किंवा सामर्थ्यवान असायला श्रीमंतीच्या वारसाची गरज लागणार नसून ज्ञानाची श्रीमंतीच उपयोगी पडणार आहे. शरद पवार यांच्या तरूणपणाचे छायचित्र बारामतीत अत्याधुनिक शिक्षण संस्थांची निर्मिती पवार, आपल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, आपल्या मुलाबाळांना आधुनिकतेचे तंत्रज्ञानाचे शिक्षण द्या, ज्ञान हीच भविष्यात खरी संपत्ती आहे, असे नेहमी सांगतात. त्यासाठीच त्यांनी बारामतीत विद्यानगरी तसेच माळेगाव परिसरात माळेगाव कारखान्याच्या वतीने पॉलिटेक्निकल कॉलेज, मुलींसाठी शारदानगर, सोमेश्वर कारखान्याच्या वतीने अत्याधुनिक पॉलिटेक्निकल शिक्षणसंस्था सर्वसामान्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. गरिबांसाठी मोफत शिक्षणाची सोय सहकार क्षेत्र हेशरद पवारांचे आवडते क्षेत्र असले तरी काळाची गरज ओळखून त्यांनी सहकार क्षेत्रातदेखील बदल घडवून आणले आहेत. बळीराजाच्या जीवनात नवचैतन्य व अर्थकारणाची पहाट उजेडायची असेल तर सहकारातून शिक्षण हा मंत्र यशस्वी होणार हे ओळखून दीन-दलित, गरीब विद्यार्थ्यांना हेरून मोफत शिक्षण देण्याचे काम शरद पवार अविरतपणे करीत आहेत.