पुणे- बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने सुप्रिया सुळे यांचा पराभव केला तर मी राजकारणातून निवृत्त होईन. मात्र, आम्ही भाजपचा पराभव केला तर त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं, असं थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना दिले आहे. बारामतीतून सुप्रिया सुळे या लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने विजयी होतील, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
बारामती जिंकून दाखवाच; हरल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन, अजित पवारांचे भाजपला आव्हान
भाजपने बारामती जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन... जर भाजप हरले तर त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे... राष्ट्रावादीचे नेते अजित पवाराचे भाजपला आव्हान
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याची भाषा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील तसेच राज्य पातळीवरील नेत्यांकडून सातत्याने केली जात होती. त्याला अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिला आहे. बारामती मतदार संघासाठी अजित पवार यांनी मंगळवारी बारामतीतल्या काटेवाडी येथे मतदान केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला आव्हान देत सुप्रिया सुळे बहुमताने निवडून येतील असा दावा केला.
भाजपचे नेते अमित शहा यांनी बारामतीत येऊन पवारांना उखडून टाकण्याची भाषा केली होती. त्यांची ही भाषा योग्य नव्हती पवारांसारख्या ६० वर्ष राजकारणात असलेल्या माणसासंदर्भात असं वक्तव्य करणं योग्य नव्हतं. मात्र भाजपच्या विविध नेत्यांकडून अशा प्रकारची भाषा वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जात आहे. उलट अमित शहा यांच्या बारामतीतल्या भाषणानंतर बारामतीमधले मतदार पेटून उठले आहेत. शिवाय ते सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले असल्याचे चित्र मला दोन दिवसात दिसल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.