महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी अर्धनग्न आंदोलन; विविध मागण्यांसाठी पुणे ते नागपूर पदयात्रेला सुरवात

Matang Reservation : मातंग समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी पुणे ते नागपूर अशा पदयात्रेला आज पुण्यात सुरवात झाली. यावेळी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करण्यासाठी आंदोलन करत असल्याचं म्हटलंय.

Matang Reservation
Matang Reservation

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 5:43 PM IST

Updated : Nov 16, 2023, 6:04 PM IST

विष्णू कसबे यांची प्रतिक्रिया

पुणे Matang Reservation :मातंग समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज पुणे ते नागपूर पदयात्रेला सुरुवात झाली आहे. लहुजी वस्ताद तालमीसमोर अर्धनग्न आंदोलन करत मातंग समाजाचे कार्यकर्ते नागपूरकडं कूच करत आहेत. सरकारनं लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा मातंग समाज राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

वेगळं आरक्षण देण्याची मागणी :लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं आजपासून पुणे ते नागपूर पदयात्रेला सुरुवात झाली आहे. मातंग समाजाचं त्यांच्या लोकसंख्येनुसार वर्गीकरण करून त्यांना वेगळं आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. तसंच झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आम्ही पुणे ते नागपूर अशी पदयात्रा काढत असल्याचं लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

समाजाच्या लोकसंख्येनुसार वर्गीकरण करा : तामिळनाडू राज्याप्रमाणेच राज्यघटनेच्या कलम 15(4)तसंच 16(4) नुसार मातंग समाजाला शिक्षण, नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी विष्णू कसबे यांनी केली आहे. मातग समाजाचं अ, ब, क, ड असं वर्गीकरण करण्याची शिफारस राज्य सरकारनं केंद्र सरकारला करावी, अशी मागणी कसबे यांनी केली. महाराष्ट्र राज्यात मातंग समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावं, मातंग समाजाच्या लोकसंख्येनुसार त्यांचं वर्गीकरण करण्यात यावं असं देखील विष्णू कसबे यांनी म्हटलंय. यासोबतच राज्यात मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करण्यासाठी पुणे ते नागपूर पदयात्रा करत असल्याचं कसबे यांनी म्हटलंय. या आंदोलनात मातंग समाजाच्या कार्यकत्यांसह विष्णू कसबे, माजी मंत्री रमेश बागवे सहभागी झाले आहेत.

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या :यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. संगमवाडी पुणे येथील आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचं काम तातडीनं सुरू करावं, असं देखील कसबे यांनी म्हटलंय. फलोत्पादन, इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये बिहार राज्याप्रमाणेच अ, ब, क, ड असं वर्गीकरण करून उपेक्षित मातंग समाजाला न्याय द्यावा, तसंच इतर जातींचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी विविध योजना राबवण्याची मागणी विष्णू कसबे यांनी यावेळी केली आहे. सरकारनं आमची दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विष्णू कसबे यांनी दिला आहे.

हेही वाचा -

  1. Anger of Matang community : मातंग समाजाचा विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आक्रोश
  2. बीडमध्ये मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी एकाची जलसमाधी
Last Updated : Nov 16, 2023, 6:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details