पुणे - जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर तालुक्यातील शेतकरी काही दिवसांपूर्वी दुष्काळाच्या फेऱ्यात अडकला होता. तर आता देखील परतीच्या पावसाने शेतकऱ्याला मेटाकुटीस आणले आहे. शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. तर शेतीला तलावाचे स्वरूप आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मागील 3-4 वर्षांपासून जिल्ह्यात मोठे दुष्काळी संकट आले होते. या दुष्काळी संकटावर मात करत शेतकरी कसाबसा उभा राहिला. यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी तुरळक पावसावर केली. मात्र, पीक उगवणीला आल्यावर पावसाने दांडी मारली. तर सध्या पीक काढणीला येताच परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, लसूण, सोयाबीन, ऊसाची शेती पाण्याखाली आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी गावागावांत जाऊन बळीराजाचे पाय धरले. मात्र, आता हाच बळीराजा संकटात असताना हे राजकीय नेते सत्तेची गणिते जुळवण्यात व्यस्त आहेत आणि कष्टकरी बळीराजा कडे पाहायला या राजकीय नेत्यांना आता वेळ उरला नाही.