पुणे- खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ हा राज्यात महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघाला चाकण औद्योगिक हब, भिमाशंकर ज्योतिर्लिंग, वारकऱयांचे श्रद्धास्थान आळंदी आणि क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांचे जन्म गाव राजगुरूनर यामुळे महत्त्व आहे. इतिहासाचा वारसा आणि औद्योगिकरणामुळे बदललेला तालुक्याचा चेहरा, असा दोन्ही अंगानी पूर्णत्व लाभलेला हा मतदारसंघ आहे. मात्र, या मतदारसंघातील राजकारण कधी कुठे वळण घेईल, याचा काही नेम नसतो.
खेड-आळंदी हा मतदारसंघ पुणे-नाशिक महामार्गाच्या दुतर्फा पसरला आहे. भामा-आसखेड, कळमोडी, चासकमान या धरणांच्या माध्यमातून संपूर्ण तालुका सिंचनाखाली आला आहे. भुईकोट, भोरगिरी आणि देव-तोरणे या किल्यांचा ऐतिहासिक वारसा या मतदारसंघाला लाभला आहे. या मतदारसंघातील चाकण औद्योगिक वसाहतीत देशी-विदेशी छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने राज्य-परराज्यातून नोकरदार स्थायिक झाला आहे. निमशहरी भागात शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. याच मतदारसंघात येणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गाला वाहतूक कोंडीचा मात्र नेहमी सामना करावा लागतो.
हेही वाचा - आंबेगाव विधानसभा: वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्याला आढळराव पाटील देणार का धक्का?
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जात होता. मात्र, या मतदारसंघात २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना पक्षांतर्गत विरोध वाढत जाऊन परिवर्तनाच्या वाऱ्यात मोहितेंसमोर मोठा विरोधाचा डोंगर उभा राहिला आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले सुरेश गोरे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आमदारकी मिळवली. मात्र, तालुक्यात झालेल्या या बदलातून मागील ५ वर्षात भरीव विकास कामे करण्यात विद्यमान आमदार सुरेश गोरे मात्र कमी पडले. यातून तालुक्यातील जनतेचा भ्रमनिरास झाल्याची टिका माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केली आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसवरील नाराजी आणि शिवसेनेतील गटबाजी भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांच्या मात्र पथ्यावर पडली. तालुक्याची भाजपने बांधणी करत खेड व आळंदी या दोन्ही नगरपरिषदा, दोन जिल्हा परिषद गट, दोन पंचायत समिती गण ,काही ग्रामपंचायती आणि काही ठिकाणच्या विविध कार्यकारी सोसायट्यामध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापटांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यात भरघोस विकास कामे भाजपाने राबवली. यात शिवसेनेचे आमदार गोरे मात्र सातत्याने कमी पडतानाच दिसून आले.
२०१८ ला चाकणमध्ये मराठा आंदोलनाची ठिणगी पडली. यात ओबीसी नेतृत्वातून आमदार गोरे खेडचा गड राखत असताना राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर चाकण राजगुरुनगर येथील हिंसक मराठा आंदोलनाचे मुख्य सुत्रधार करत गुन्हे दाखल केले गेले. लोकसभेनंतर पुन्हा एकदा या मतदारसंघात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. याच जातीपातीच्या राजकारणाचा फटका लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला बसला होता. यामुळे सध्यपरस्थीतीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपच्या सुरू असलेल्या चढाओढीच्या राजकारणाचा फायदा भाजपला होण्याची चिन्ह पहायला मिळत आहे.
हेही वाचा - आढावा उस्मानाबाद विधानसभेचा : राजेनिंबाळकरांना थोपवण्यासाठी पाटील जाणार भाजपत?
या मतदारसंघात उभी राहिलेली उद्योगनगरी व वाढते शहरीकरण यामुळे येथे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यात शिवसेना कमी पडली आहे. असे असताना पूर्वाश्रमीचे शिवसेनेत असलेले आता राष्टवादीचा घरोबा केलेले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठे संघटन एकवटले. हे पाहून शिवसेनेत पक्षांतर्गत बदलाकडे लक्ष केंद्रित करून आमदार गोरेंना विरोध ठरणारे रामदास ठाकुर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात शिवसेना यशस्वी ठरली.
शिवसेनेत पक्षांतर गटबाजी सुरू असतानाही भाजप-शिवसेना युती होऊन आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर या निवडणुकीत विजय मिळणार असल्याचे विद्यमान आमदार सुरेश गोरे ठामपणे सांगत आहेत.
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष आपल्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात या मतदारसंघातील समस्या आजही कायम आहेत. तर लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात तरुणांचा मोठा प्रभाव असल्याचेही दिसत असून तरुणांचे आकर्षण असणारा उमेदवार या मतदारसंघात आपला विजयाचा गड राखणार असच चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.