पुणे - खरीप हंगामात घेतलेले पीककर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च करण्यात आली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्जावर 50 हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मार्च अखेरीस कर्ज भरण्यासाठी जिल्हा बँकेत तुडुंब गर्दी केली आहे. मात्र, या गर्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची जिल्हा बँकेत तुडुंब गर्दी... हेही वाचा....धक्कादायक ! कोरोनोचा असाही बळी.. जिल्हाबंदीसाठी खोदला रस्ता, उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, पीककर्ज मार्च अखेरीस भरले तर शासनाकडून पन्नास हजारांची सवलत मिळणार असल्याने खरीप हंगामातील घेतलेले पीककर्ज भरण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. शेतकऱ्यांसाठी सोसायटीमार्फत खरीप हंगामात पीककर्जाचे वाटप केले जाते. हे कर्ज मार्च अखेरीस नियमित भरण्याची अट राज्य सरकारने लावली आहे.
सध्या पीककर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली नसल्याने शेतकरी पिककर्ज भरण्यासाठी जिल्हा बँकेत गर्दी करत असल्याचे चित्र पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखांमध्ये दिसत आहे. यात वयोवृद्ध शेतकरी, महिला असे सर्वजण आहेत. मात्र, राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता बँकेत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे दिसत आहे. एकीकडे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे, तर दुसरीकडे जिल्हा बँकांच्या बाहेर पीककर्ज भरण्यासाठी खातेदारांची तुडुंब गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारने जिल्हा बँकेच्या पीककर्जासाठी मुतदवाढ देण्याची मागणी करण्यात येत आहे.