पुणे - आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. यामुळे परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प देत अनेक परीक्षा केंद्रावर त्यांचे स्वागत करण्यात आले. भावे हायस्कूलमध्येही विद्यार्थ्यांचे अशाप्रकारे स्वागत करण्यात आले. परीक्षा केंद्रावर अधिकारी, शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नीट पेपर लिहा आणि टेन्शन घेऊ नका, असा सल्ला दिला.
पुण्यात बारावीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत
आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. यामुळे पुण्यात बारावीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प देऊन अनेक परीक्षा केंद्रावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
बारावीचा आज पहिला पेपर असल्यामुळे पुण्यातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. आपल्या मुलांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांनीही गर्दी केली होती. मुलांची बारावीची परीक्षा असल्यामुळे काही पालकांनी खास रजा ही काढल्याचे सांगितले. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरात तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले आहेत.
शालेय जीवनातील शेवटची आणि करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण परीक्षा म्हणून बारावीच्या परीक्षेकडे पाहिले जाते. उत्साह, हुरहुर, परीक्षेचा ताण अशा संमिश्र वातावरणामध्ये विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात असतात. विद्यार्थ्यांच्या मनावर असलेला ताण हलका व्हावा, तसेच त्यांना पेपर सोडवणे सोपे जावे यासाठी विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.