पुणे -अनलॉक सुरू झाल्यापासून शासन हॉटेल्स आणि रेस्टॉरंट उघडण्यास कधी परवानगी देते, याकडे मालक डोळे लावून बसले होते. शासनाने अनलॉक-५ परवानगी दिली. मात्र, हॉटेल व रेस्टॉरंट मालकांच्या अडचणी संपत नसल्याचे दिसते आहे. आता बिहारमध्ये होणाऱया निवडणुकीचा फटका पुण्यातील हॉटेल मालकांना बसला आहे. बिहार निवडणूक आणि पुण्यातील हॉटेल्सचा काय संबध हा प्रश्न पडणे साहजिक आहे. याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी पुण्याच्या मध्यभागी असलेल्या अविष्कार रेस्टॉरंटचे मालक बाळासाहेब अमराळे यांच्याशी संवाद साधला आहे.
राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज्य शासनाने हॉटेल व रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अनलॉक सुरू झाल्यानंतर काही निर्बंध कायम ठेवत हॉटेल व रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठे पाऊल टाकत रेस्टॉरंटस् आणि हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, शासनाने परवानगी दिली असली तरी बाहेरील राज्याचे कामगार परत न आल्याने हॉटेल चालकांना काम करणे कठिण झाले आहे, असे अमराळे म्हणाले.