महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात कोरोनाचा कहर, सर्वाधिक रुग्ण भवानी पेठेत

पुणे महापालिका हद्दीत दाट लोकवस्ती असलेल्या भागात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका भवानी पेठेला बसला आहे. त्यामुळे, पुण्यातील सर्वाधिक 168 कोरोनाबाधित रुग्ण येथे आहेत. त्याखालोखाल कसबा विश्रामबाग येथे 102 तर ढोले पाटील रोड परिसरात 97 कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती महापालिका प्रशासनकडून देण्यात आली आहे.

भवानी पेठेत कोरोनाचा विळखा
भवानी पेठेत कोरोनाचा विळखा

By

Published : Apr 22, 2020, 11:40 AM IST

पुणे- शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या भवानी पेठेला तर कोरोनाचा जास्त फटका बसला आहे. येथे शहरातील सर्वाधिक म्हणजेच 168 रुग्ण आहेत. त्याखालोखाल कसबा विश्रामबाग येथे 102 तर ढोले पाटील रोड परिसरात 97 कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती महापालिका प्रशासनकडून देण्यात आली आहे.

पुणे महापालिका हद्दीत दाट लोकवस्ती असलेल्या भागात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका भवानी पेठेला बसला आहे. त्यामुळे, पुण्यातील सर्वाधिक 168 कोरोनाबाधित रुग्ण येथे आहेत. याशिवाय पुण्यातील येरवडा - कळस - धानोरी येथे 68, शिवाजीनगर - घोलेरोड येथे 59, धनकवडी - सहकारनगर 38, वानवडी - रामटेकडी येथे 33, हडपसर - मुंढवा परिसरात 26, बिबवेवाडीत 24, कोंढवा - येवलेवाडी 10, सिंहगड रोड येथे 8, वारजे - कर्वेनगर 8, औंध - बाणेर 2, कोथरूड - बावधन 1, अशी कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी आहे.

ससून रुग्णालयात १००, नायडू रुग्णालयात १२०, तर भारती हॉस्पिटलमध्ये १३५ आयसोलेशन बेडची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय बोपोडी येथील महापालिकेच्या रुग्णालयातदेखील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे ससून, नायडूसह भारती हॉस्पिटलमधील जागादेखील कमी पडत आहे.

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण महापालिका हद्दीतील परिसर सील करण्यात आला आहे. त्यासंबंधीचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. पोलिसांनीही त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी काही कालावधीत सूट देण्यात आली आहे. मात्र, कडक अंमलबजावणीमुळे अतिउत्साही नागरिकांना आता काही प्रमाणात आळा बसला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत 3 मेपर्यंत पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details