पुणे -मागील दहा दिवसांपासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कोरोनावर प्रतिबंध आणण्याच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या सद्य परिस्थिती आढावा घेतला.
टेस्टिंग वाढवण्यावर भर -कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात दररोज दहा हजार टेस्टिंग करण्यावर भर दिला जाणार आहे. टेस्टिंगसाठी ससून रुग्णालयात आणखी काही वेगळी व्यवस्था करता येईल का? याचीही चाचपणी सुरू आहे. यासाठी ससून रुग्णालयाला स्वतंत्र मशीन ही उपलब्ध करून देण्यात येतील. ससून रुग्णालयात असणाऱ्या लॅबमध्ये टेस्टिंग करण्यासंदर्भात तेथील डॉक्टरांशी चर्चा केली जाणार आहे.
मास्क न वापरणाऱ्याविरोधात कारवाई-कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांची पुन्हा एकदा कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एकदा दिवसात 3 हजार पेक्षा जास्त कारवाई केली जात आहे. आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्यांकडून 26 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय ग्रामीण भागात असणारे रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणाहून कोरोनाचे फैलाव रोखण्यासाठी त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमभंग करणाऱ्या 120 हुन अधिक रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असून 18 लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. पुन्हा एकदा कोरोनाचे नियम पाळले जावेत यासाठी कारवाईची गती वाढवली जाणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज जिल्ह्यात 21 हॉटस्पॉटजिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारे 21 हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या 1200 हुन अधिक कोरोना रुग्ण आहेत. यात सर्वाधिक 300+ रुग्ण शिरूर तालुक्यात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची टेस्टिंग करण्यावर भर दिला जाणार आहे.
आठवडी बाजारावर निर्बंधग्रामीण भागातील गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावण्यात येणार आहेत. भाजी खरेदी करताना कोरोनाचा फैलाव होत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या मोकळ्या जागांवर भाजी विक्रेत्यांना भाजीपाला विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे.
बंद कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करणारकोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ग्रामीण भागात उभारलेले कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते. परंतु आवश्यकता भासल्यास हे सेंटर तत्काळ पुन्हा सुरू केले जातील. मनुष्यबळाची कमतरता भासू नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मनुष्यबळ भरतीची तयारीही जिल्हा प्रशासनाने केली आहे. आवश्यकता भासल्यास मनुष्यबळ आणि इन्फ्रास्ट्रक्चर तातडीने उभे करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. अशाप्रकारे टेस्टिंग, एसओपी, इन्फ्रास्ट्रक्चर, मनुष्यबळ, औषधी या सगळ्या बाबतीत जिल्हा प्रशासनाची तयारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याला कसे तोंड द्यायचे याचा अनुभवही आहे. नागरिकांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाच तर मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करून लोकांवर उपचार करून त्यांना आपण बरे करू शकतो, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी व्यक्त केले