पुणे - माजी मंत्री संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडीलांना पाच कोटी रुपये दिले आहेत. त्यांनी हे पैसे जमिनीत पुरून ठेवले आहेत. पैशावरून आता त्यांच्या घरामध्ये भांडण देखील सुरू झाले आहे. पूजाचे आई-वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप स्वत:ला पूजाच्या चुलत आजी म्हणवणाऱ्या शांताबाई राठोड यांनी केला आहे.
शांताबाई राठोड यांनी पूजाचे आई-वडीलांवर आरोप केले काय म्हणाल्या शांताबाई राठोड -
'ज्या आई-वडिलांना पैशासमोर स्वतःच्या मुलीची किंमत वाटत नाही, तर मी चुलत आजी कुठली कोण? पूजाच्या आईवडिलांनी समाजाची दिशाभूल तर केलीच आहे शिवाय आता मुख्यमंत्र्यांची ही दिशाभूल करत आहेत. संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचा आवाज बंद केला आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीही समोर येऊन संजय राठोड यांच्या विरोधात बोलणार नाहीत. आमची मुलगी आजारी होती आणि त्यामुळेच तीचा मृत्यू झाला असेच ते म्हणतील,' असा गौप्यस्फोट पूजा चव्हाण हिची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी एका व्हिडीओद्वारे केला आहे.
वानवडी पोलीस ठाण्यात दिली तक्रार -
शांताबाई राठोड या पूजा चव्हाणच्या चुलत आजी आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी त्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह काल वानवडी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. पोलिसांनी त्याची तक्रारही नोंदवून घेतल्याचे म्हटले आहे. परंतु, गुन्हा दाखल झालेला नाही. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा शांताबाई राठोड आणि तृप्ती देसाई यांनी घेतला होता. यासाठी त्यांनी वानवडी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलनही केले. परंतु त्यानंतर पोलिसांनी त्यांना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नोटीस बजावली होती.