राजगुरुनगर (पुणे) - कोरोनानंतर शेती व शेतकरी उभारी घेईल अशी आशा असताना शेतमालासह तरकारी मालाला बाजारात कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतमाल काढणीचाही खर्च मिळत नसल्याने उभ्या शेतात शेळ्या-मेंढ्या सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
तरकारी मालासह भाजीपाल्याची कवडीमोल किंमतीने विक्री
कोरोनाचे लॉकडाऊनमध्ये शेतमाल विक्री न होतातच शेतात सडून गेला. त्यानंतर चक्रीवादळाचे संकट आले. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या काळात लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असताना चांगला बाजारभाव मिळण्याची आशा होती. त्याच काळात आवकाळी पावसाने उभी पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. यातूनही न थांबता शेतकरी पुन्हा उभारी घेत शेतात काबाडकष्ट करत नव्याने उभा राहिला. मात्र, सध्या तरकारी मालासह भाजीपाल्याची कवडीमोल किंमतीने विक्री होत आहे. त्यामुळे खर्च निघत नसल्याने शेतातच जनावरे, शेळ्या, मेंढ्या सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.