पुणे - बाबरी विद्ध्वंस प्रकरणात आज लखनऊ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. घडलेली घटना पूर्वनियोजित नव्हती असे देखील न्यायाधीशांनी स्पष्ट केले. न्यायालयाचा हा निकाल अविश्वसनीय असून पचण्यास कठीण आहे, असे स्पष्ट मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी व्यक्त केले.
बाबरी प्रकरणी कोर्टाचा निर्णय अविश्वसनीय; माजी केंद्रीय गृहसचिवांनी व्यक्त केले मत
अयोध्यामधील बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी तब्बल 28 वर्षांनंतर न्यायालयाने आज निर्णय जाहीर केला. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली, असे निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवले. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणात 200पेक्षा अधिक लोकांच्या साक्षी घेतल्या गेल्या. हजारो पानांचे आरोपपत्र आहे. तरीही आरोपींची मुक्तता झाली. यावरून ती मशीद आपोआप पडली का? असा प्रश्न निर्माण होतो, असे गोडबोले म्हणाले. शेकडो लोकं त्या ठिकाणी जमली होती. अनेकजण घुमटावर चढले होते. एवढी मोठी मशिद पाच तासात पडली. तर यामागे कोणीतरी नक्कीच असेल ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
बाबरीसारख्या घटनांमधून आपली सुटका होणार नाही. आता मथुरा, वाराणसी याठिकाणी नवीन मंदिरे बांधली जावीत, अशी मागणी होत आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकरणांपासून दूर रहायचे असेल तर धर्म आणि राजकारण यांची फारकत होणे गरजेचे आहे. मात्र, राज्यकर्ते याविषयी काही बोलायला तयार नाहीत. येणाऱ्या काळात आपण काहीही केलं तरी सुटू शकतो, अशी मानसिकता यातून निर्माण होऊ शकते, असे मत माधव गोडबोले यांनी व्यक्त केले.