महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे: ढिगाऱ्यातून कामगारांना वाचविताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू; दोन जखमी

कर्तव्य बजाविताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत ठेकेदाराला हलगर्जीपणा दिसून येत आहे. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाचजण अडकले
सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाचजण अडकले

By

Published : Dec 1, 2019, 9:38 PM IST

Updated : Dec 2, 2019, 2:59 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या खोदकामादरम्यान कामगाराच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला. त्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे बचाव कार्य सुरू होते. त्यावेळी पुन्हा मातीचा ढिगारा कोसळला. यात अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव, निखिल गोगावले आणि सरोष फुंदे हे जवान अडकले गेले. यामधील विशाल जाधव (32) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

निखिल आणि सरोष यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामगार नागेश अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेला आहे. त्याचा शोध एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि लष्कर पथक घेत आहे. या घटनेला जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपआयुक्त स्मिता पाटील यांनी सांगितले.

दुर्घटनेबाबत बोलताना मनपा आयुक्त व पोलीस उपआयुक्त

अशी घडली दुर्घटना-

सविस्तर माहिती अशी की, रविवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास बदली कामगार नागेश कल्याणी जमादार जलवाहिन्याच्या खोदकामासाठी खडड्यात काम करत होता. तेव्हा त्याच्या अंगावर अचानक मातीचा ढिगारा कोसळला. त्याचा आवाज ऐकून शेजारीच असलेले ईश्वर बडगे आणि सीताराम सुरवसे हे धावत आले. कामगार नागेश हा कंबरेएवढ्या मातीत अडकला होता. तेव्हा, दोघेही त्यांना काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, पुन्हा मातीचा ढिगारा कोसळल्याने तिघेही अडकले.

सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाचजण अडकले

अग्निशमन दलाला माहिती देवून पाचारण करण्यात आले. तातडीने विशाल जाधव, सरोष फुंदे, निखिल गोगावले हे घटनास्थळी दाखल झाले. शिडीच्या साहाय्याने ते खड्ड्यात उतरले. मदतीसाठी गेलेले तरुण ईश्वर आणि सीताराम यांना सुखरूप बाहेर काढले. कामगार हे नागेशला काढण्याचे शर्थीचे प्रयत्न तिन्ही जवान करत होते. तेव्हा पुन्हा मातीचा ढिगारा नागेश, विशाल, निखिल आणि सरोष यांच्या अंगावर कोसळला.

तोंड खाली आणि पाय वर या स्थितीत विशाल दुर्घटनास्थळी अडकले होते. त्यानंतर अग्निशमन दलाचे दुसरे पथक, एनडीआरएफ, लष्कर घटनास्थळी दाखल झाले. कर्मचारी निखिल, सरोष आणि विशाल यांना खडड्याच्या बाहेर काढण्यात आले. मात्र, विशाल यांचा औंध येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

विशाल हे मूळ सातारा येथील रहिवासी-
विशाल यांच्यापाठीमागे एक दोन वर्षांची मुलगी आणि पत्नी आहे. त्यांचे वडील हणमंतराव जाधव हे पोलीस खात्यामधून निवृत्त झाले आहेत. ते मुंबई येथे स्थायिक आहेत. जाधव कुटुंब हे मूळ सातारा येथील आहे. दरम्यान या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी-

कर्तव्य बजाविताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत ठेकेदाराला हलगर्जीपणा दिसून येत आहे. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Last Updated : Dec 2, 2019, 2:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details