पुणे :पिंपरी चिंचवड शहरात वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. सांगवी परिसरामध्ये भरदिवसा अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार केल्याची घटना घडली असून, यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास सांगवी परिसरात घडली आहे. सागर शिंदे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सागर शिंदेची गोळी मारून हत्या केल्यामागे पूर्ववैमान्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे सांगवी परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रक्षक चौकाजवळ गोळीबार : सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध-रावेत बीआरटी मार्गावर असलेल्या रक्षक चौकाजवळ सागर शिंदे आपल्या मित्रांसोबत जात होता. त्यानंतर अज्ञात इसमाकडून गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. तर पोलीस पुढील तपास करत आहेत.
पैशाच्या देवाण घेवाणीवरून वाद: सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सागर शिंदे आणि आरोपी एकाच कारमधून सांगवी परिसरातील औंध- रावेत बीआरटी मार्गावर असलेल्या रक्षक चौकाजवळ आले. गाडीमध्येच सागर आणि आरोपी योगेश जगताप यांच्यात पैशाच्या देवाण घेवाणीवरून वाद सुरू झाले. एकाच गाडीतून येताना वाद विकोपाला गेला,आणि आरोपी योगेश जगतातने सागरवर पहिली गोळी झाडली. सागर गाडी बाहेर निघून पळू लागला, मात्र तेवढ्यात योजेश जगतापने सागरच्या पाठीत दुसरी गोळी झाडली. त्यात सागरचा मृत्यू झाला. भारत इलेक्ट्रिक कंपनीसमोर हा संपूर्ण प्रकार घडला. त्यानंतर आरोपी योगेश जगताप आपल्या सहकाऱ्यासोबत गाडीतून खाली उतरले. त्यांनी चौकात जाऊन एका दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवत अडवून त्याची दुचाकी घेऊन पळ काढला.