पुणे- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन करत आयोजित केलेल्या, इयत्ता अकरावी काॅमर्सच्या पुनर्परीक्षेवर प्रशासनाने अचानक छापा टाकून कारवाई केली. आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी स्नेहवर्धक संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि संबंधित पर्यवेक्षक व परीक्षक अशा एकूण चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी ही माहिती दिली.
तळेगाव दाभाडे येथील स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्टचे ज्युनिअर काॅलेज ऑफ सायन्स अँड काॅमर्स काॅलेजमध्ये हा प्रकार घडला. शुक्रवारी सकाळी 9 ते 12 या दरम्यान इयत्ता 11वी काॅमर्सच्या आयटी विषयाची परीक्षा घेण्याकरिता शाळेच्या "एसवायजेसी लेक्चर्स" या व्हॉट्सअॅप ग्रुपवर परिक्षेचे वेळापत्रक टाकण्यात आले होते. त्यानुसार 27 विद्यार्थ्यांना बालविकास शाळेत बोलावून त्यांची परीक्षा घेण्यात आली.