पुणे - कांद्याचे भाव वाढले असताना गोणीत दगड लपवून वजन वाढवण्याचा एका शेतकऱ्याचा बनाव उघडकीस आला आहे. हा प्रकार ओतूर उपबाजार समितीत कांदा लिलाव सुरू असताना निदर्शनास आल्याने व्यापारी वर्ग आणि उपस्थित शेतकरी वर्ग अचंबित झाला.
ओतूरमध्ये एका शेतकऱ्याने वजन जास्त भरण्यासाठी कांद्याच्या गोणीत चक्क दगड भरल्याचे निदर्शनास आले आहे. ओतूर उपबाजारात समितीत एका शेतक-याने कांदा विक्रीसाठी आणला होता. सध्या कांद्याला 40 रुपये प्रतिकिलो प्रमाणे बाजारभाव मिळत आहे. काही ठिकाणी कांदा याहून अधिक किंमतीने विकण्यात येत आहे. या विक्री होत असलेल्या कांद्यातील सात गोण्यांमध्ये कांद्याबरोबर 22 किलो दगड टाकल्याचे समोर आले. बाजारसमितीत लिलाव सुरू असताना कांद्याचे पोते फोडण्यात आले. यावेळी शेतकऱ्याचा हा बनाव उघडकीस आला. कांद्याच्या वाढत्या बाजारभावाबरोबर दगडाचे पैसे मिळवण्याचा निंदनीय प्रयत्न ओतूर उपबाजारात हाणून पाडण्यात आला. शेतकऱ्याने चांगल्या प्रतवारीचा माल विक्रीसाठी आणून उत्तम भाव मिळवण्यासाठी कष्ट घ्यावेत. मात्र, दगड गोणीत भरून फसवणूकीचे प्रकार करू नये, अशी अपेक्षा बाजारात उपस्थितांनी व्यक्त केली आहे. एखाद्या शेतकऱ्याने केलेल्या प्रकाराने संपूर्ण शेतकरी वर्गाला काळीमा लागता कामा नये, असे काही उपस्थित म्हणाले.