महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंजवडीत आयकर विभागाच्या छाप्याची भीती दाखवून अभियंत्याला 11 लाखांचा गंडा

दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटना वाढत असल्याचे दिसते. या फसवणुकीला अनेक सुशिक्षित नागरिकही बळी पडत आहेत. हिंजवडीमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे.

By

Published : Dec 19, 2020, 10:54 AM IST

deceived
फसवणूक

पुणे (पिंपरी-चिंचवड) -आयटी हब असणाऱ्या हिंजवडीत संगणक अभियंत्याला आयकर विभागाच्या छाप्याची भीती दाखवून ११ लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. ओळखीचा वापर करून आरोपीने हा गुन्हा केला. आरोपीने अभियंत्याचे क्रेडिट कार्ड वापरून लाखो रुपयांचे कर्ज देखील घेतले असल्याची माहिती उघड झाली. ही घटना 25 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2020 दरम्यान हिंजवडीमध्ये घडली आहे. वरुण संजयकुमार तिवारी (वय- 24 रा. फेज-1 हिंजवडी), असे फसवणूक झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी स्वरूप मंजुनाथ शेट्टी (रा. मणीपाल, कर्नाटक) याच्या विरोधात हिंजवडी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी ऑफिसमधील सहकाऱ्याचा बालमित्र -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणक अभियंता वरुण हा हिंजवडीत विप्रो कंपनीमध्ये कामाला आहे. त्याची सहकारी उत्कर्षा म्हात्रे हिच्या माध्यमातून तिचा बालपणीचा मित्र स्वरूप याच्यासोबत ओळख झाली होती. एका हॉटेलमध्ये भेटल्यानंतर आरोपी स्वरूप याने वरुण यांच्याकडे फ्लॅट घेण्यासाठी दहा लाख रुपये मागितले होते. मात्र, वरुण यांनी पैसे देण्यास नकार दिला होता.

देवाण-घेवाणीचा घातला घोळ -

त्यानंतर आरोपी स्वरूप याने 'मी तुझ्या बँक खात्यात दहा लाख पाठवतो, ते तू मला रोख स्वरूपात दे', असे म्हटले. त्याची मागणी फिर्यादी वरुण यांनी तत्काळ मान्य केली. आरोपी स्वरूपने एस.बी.आय बँकेतून दहा लाख आरटीजीएसद्वारे भरल्याचा मेसेज त्यांना दाखवला. मात्र, फिर्यादीच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यानंतर आरोपी स्वरूप याने दहा लाख रुपयांची लिन अमाऊंट सिटी बँकेच्या पोर्टलवर फिर्यादीच्या नावावर जमा झाल्याचे दाखवले. ते पोर्टल सिटी बँक मॅनेजरचे असल्याचे सांगितले. आरोपी स्वरूपने आयकर विभागाचा बनावट मेल फिर्यादीच्या मेलवर पाठवला व टॅक्स भरण्याची मागणी केली.

आयकर विभागाच्या मेलमुळे फिर्यादी घाबरला -

फिर्यादीला आयकर विभागाबाबत जास्त माहिती नसल्याने ते घाबरून गेले. याची माहिती त्यांनी आरोपी स्वरूपला दिली. त्याने त्यांना आणखी भीती दाखवत आयकर भरावा लागेल अन्यथा छापा पडेल असे सांगितले. फिर्यादीने भीतीपोटी 11 लाख आरोपीला आयकर भरण्यासाठी दिले.

आरोपीने क्रेडिट कार्ड, मोबाईल आणि 11 लाख रुपये केले लंपास -

आरोपीने फिर्यादीच्या नावाचा, क्रेडिट कार्ड आणि मोबाईलचा वापर करून काही अ‌ॅपवरून चार लाख रुपयांचे कर्जही घेतले. एकूण अकरा लाखांची फसवणूक आरोपीने केली. पैसे काढून घेतल्यानंतर त्याने फिर्यादीला टॅक्स भरल्याचे सांगितले. टॅक्स भरल्याची पावती मेलवर येईल, असे सांगितले. मात्र, दुसऱ्या दिवशी आरोपी स्वरूपला हिंजवडीमधून कर्नाटक पोलिसांनी आणखी एका गुन्ह्यासाठी अटक केल्याचे समजले. त्यामुळे आपलीही फसवणूक झाल्याचे फिर्यादीला कळले. त्यानंतर त्यांनी हिंजवडी पोलिसात स्वरूप शेट्टी याच्या विरोधात फिर्याद दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details