पुणे -वीजबिल न भरल्यामुळे जम्बो रुग्णालयाचे वीज कनेक्शन महावितरणच्यावतीने तोडण्यात आले आहे. जम्बो रुग्णालयाचे जानेवारी महिन्यापासूनचे वीजबिल थकित असल्यामुळे महावितरणने हे पाऊल उचलले. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे हे जम्बो रुग्णालय पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यादृष्टीने तयारीही सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वीच महापालिका प्रशासनाशी कोणताही संपर्क न करता महावितरणने अशाप्रकारे वीज कनेक्शन तोडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
पुन्हा वीज कनेक्शन कापायला सुरुवात -
मागील काही दिवसांपासून वीजबिल थकित राहिल्यामुळे वीज कनेक्शन तोडण्याचे प्रमाण वाढले आहे. यावरून अनेकदा हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनातही वीजबिलाचा मुद्दा गाजला होता. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन सुरू असतानाच वीज तोडणी मोहीम स्थगित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अधिवेशन संपताच पुन्हा थकित वीजबिलाचा मुद्दा पुढे करून वीज कनेक्शन तोडण्यास उर्जामंत्र्यांनी परवानगी दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात वीज कनेक्शन तोडण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली होती.