पुणे - राज्यातील चौथ्या टप्प्याचे मतदान २९ तारखेला होत आहे. आज शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार थंडावणार असून आज जुन्नर, आंबेगाव, शिरूर, राजगुरुनगर अशा विविध ठिकाणी रॅली काढण्यात आल्या. जातीय राजकारणामुळे हा मतदारसंघ अधिकच चर्चेला आला होता. त्यामुळे येथील प्रचाराकडे अवघ्या महाराष्ट्र लक्ष ठेऊन होता.
शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात; युती-आघाडीकडून रॅलींचे आयोजन
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने व पाच वाजता प्रचार संपणार असल्याने मुख्य शहरांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या रॅली निघाल्या.
मागील काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुती व महाआघाडी यांच्यामध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपातून राजकीय सभा गाजल्या. मात्र, आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने पाच वाजता प्रचार संपणार असल्याने मुख्य शहरांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या रॅली निघाल्या.
शिरूर लोकसभा मतदारसंघावर गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे वर्चस्व होते. मात्र, याच आढळरावांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघात एक वेगळी रंगत पाहायला मिळाली. त्यामुळी ही निवडणूक मोठी अटीतटीची होणार असल्याचे चित्र पाहायला मिळाले.