पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय व्यक्तींना धमकवण्याचे प्रकार हे सुरू आहेत. ते सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागणारा फोन करण्यात आला होता. त्यांनतर माजी महापालिका सभागृह नेते गणेश बिडकर यांना धमकी देण्यात आली होती. आता पुण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -या प्रकरणाची माहिती बागवे यांनी पोलिसांना दिली आहे. याबाबत अविनाश रमेश बागवे (४६, भवानी पेठ) यांनी पोलिसांच्याकडे रितसर फिर्याद दिली आहे. आता पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
गणेश बिडकर यांच्याकडे खंडणीची मागणी -पुण्यात नुकतीच भाजप नगरसेवक गणेश बिडकर यांच्याकडे खंडणीची मागणी करून त्यांना धमकी देण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर आता काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला देखील धमकी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आधीच कोयता गँगने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. आता या धमक्यांचे सत्र मान्यवरांनाही सुरू झाले आहे.
अनोळखी नंबरवरून एक मेसेज -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी बागवे यांच्या मोबाईल नंबरवर अनोळखी नंबरवरून एक मेसेज आला. त्यामध्ये जल्दी से पैसे भेज वरना जान से मार देंगे, असे म्हंटले होते. तसेच तू निवडणुकीला उभ राहू नको नाहीतर गोळ्या मारू असे देखील यात म्हटले होते. यावेळी खराडीमधून मुस्कान शेख बोलत असून ३० लाख रुपये लवकर पाठवून दे नाहीतर तुला मारण्यासाठी माझी माणसे तयार आहेत. दोन दिवसात पैसे दिले नाहीतर तुला खल्लास करू असे त्या मोबाईल धारकाने म्हटले आहे, असेही बागवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - Nagpur Crime: एकाच रात्री खुनाच्या दोन घटना, नागपूर शहर हादरले!