पुणे :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दिघी पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत असलेल्या प्रेमसंबंध आणि अंतर्गत वादातून पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस ठाण्याच्या छतावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल अनिल निरवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरवणे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली.
पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी घेत कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न दीड वर्षांपासून होते प्रेमसंबंध - महिला पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल निरवणे हे दोघेही दिघी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावतात. दोघांमध्ये गेल्या दीड वर्षांपासून प्रेम संबंध होते. या महिला पोलीस उपनिरीक्षक विवाहित आहेत.
मद्यपान केलेल्या अवस्थेत कॉन्स्टेबलने टेरेसवरून घेतली उडी -
कॉन्स्टेबलने उडी मारण्या अगोदर मद्यपान केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटना झाली त्यादिवशी त्याने अचानक महिला पोलीस उपनिरीक्षकांना धमकी दिली. तसेच स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करून घेईल, असे म्हणत पोलीस ठाण्याच्या टेरेसवर जाऊन थेट खाली उडी घेतली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न आणि महिला पोलीस उपनिरीक्षकांना धमकी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन -
या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दिघी पोलीस ठाण्याची चर्चा होती. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल संपत निरवणे यांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निलंबित केले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी माहिती दिली आहे.