पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेनेची बैठक अनेक अंगानी चर्चेत राहिली. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वैर पुन्हा उघड झाले आहे. युतीचा उमेदवार कोण? यावरून परस्पर विधाने समोर आली आहेत.
बैठकीत युतीच्या उमेदवारीवरून मतभिन्नता दिसली. मला कामाला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पनवेलमध्ये तसे जाहीर केल्याचा दावा बारणेंनी बैठकीत केला. मात्र, उमेदवारीचा निर्णय आमच्या पातळीवर नव्हे, तर पक्ष नेतृत्व जाहीर करतील, असे म्हणत बारणेंची उमेदवारी निश्चित नसल्याचे बापटांनी स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असताना युतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. अशातच युतीच्या बैठकीतील या घडामोडी पार्थच्या पथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे.