पुणे - शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे पाण्यासाठी खोदलेल्या बोअरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला पोलीस, आग्निशामक दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. सार्थक राहूल धोत्रे (वय २ वर्ष, मुळ गाव माऊली नगर, ता. आष्टी, जिल्हा बीड) असे मुलाचे नाव आहे.
बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला दोन तासात काढले बाहेर, मुलगा सुखरूप
मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आज सकाळी कारेगाव येथील दादाभाऊ नवले यांच्या १५ फुट खोल बोअवेलमध्ये सार्थक खेळत असताना पडला होता. त्याला पोलीस आणि एमआयडीसी अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले आहे. यासाठी बोअरवेलच्या बाजुने समांतर खड्डा घेण्यात आला होता. सार्थकला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सध्या तापमानात प्रंचड वाढ झाली असून पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जमिनीत बोअरवेल घेतले जात आहेत. मात्र, पाणी न लागल्याने बोअरवेल तसेच उघडे सोडून दिले जात आहेत. लहान मुले खेळत असताना या उघड्या बोअरवेलमध्ये पडण्याच्या घटना घडत आहेत.