दौंड(पुणे) - राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी दौंड तालुक्यातील वाळकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकावर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा अवमान झाला होता. संभाजी विठ्ठल फराटे असे त्या मुख्याध्यपकांचे नाव आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
राष्ट्रध्वज उशिरा उतरवला
याबाबत दौंडचे गटशिक्षण अधिकारी विजय खाश्याबा पवार यांनी यवत पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. यवत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळकी येथील जिल्हा परिषद शाळेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ध्वजारोहन करण्यात आले होते. त्यानंतर शाळेमध्ये हा ध्वज सुर्यास्तापुर्वी उतरवणे आवश्यक होते. परंतु तो शाळेचे मुख्याध्यापक यांनी ध्वज सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास उतरवला.
यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
याबाबत दौंडचे गटशिक्षण अधिकारी विजय पवार यांनी जिल्हा परिषद शाळा वाळकी येथील मुख्याध्यापक संभाजी विठ्ठल फराटे ( रा.मांडवगण फराटा ता.शिरूर जि.पुणे ) यांनी ध्वज सुर्यास्तापुर्वी वेळेत सन्मानपूर्वक उतरवणे हे माहिती असतानासुद्धा त्यांनी राष्ट्रीय ध्वज वेळेत उतरवला नाही, याप्रकरणी गटशिक्षण अधिकारी यांनी यवत पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने मुख्याध्यपक फराटे यांच्यावर भारतीय ध्वज संहितेचा भंग करणे, राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.