पुणे Bikes Set On Fire:ही घटना काल मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली. वारजे येथील रामनगर पाण्याची टाकी चौक येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकी पेटवण्यात आल्या आहेत. तर एका चारचाकी वाहनाच्या काचा फोडून वाहनाचं नुकसान देखील केलं आहे. या तीन दुचाकींना लागलेल्या आगीत त्याच्या शेजारील एका रिक्षाचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे. एका दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केला असावा, अशी शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
टवाळखोरांमुळे नागरिक संतप्त :यामध्ये एक चारचाकी, एक रिक्षा आणि तीन दुचाकींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिक संतप्त झाले आहेत. यावर योग्य ती कारवाई करत रामनगर परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वारजे माळवाडी पोलीस दाखल झाले होते. त्यांनी या घटनेची माहिती घेतली असून अधिक तपास पोलीस करत आहे.
यापूर्वीही दुचाकी पेटविल्याच्या घटना उघडकीस : पुणे शहरातील टवाळखोरांचा आणि कोयता गॅंगचा हौदोस सर्वांना परिचित आहे. यापूर्वीसुद्धा टवाळखोरांनी सांस्कृतिक राजधानीत दुचाकी पेटविल्याच्या घटना घडल्या आहेत. पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील 11 जुलै, 2019 रोजी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सात दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले; परंतु तोपर्यंत या सातही दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते.
अग्निशमन दलाने विझविली आग: अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 2 वाजून 42 मिनिटांनी अग्निशमन दलाच्या कार्यालयात फोन आला. त्यात बालाजीनगर येथे गाड्यांना आग लागल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान ही आग कोणी लावली याचा तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीद्वारे आरोपीचा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा:
- जुन्या वादातून जळगावात जाळल्या २ दुचाकी; मध्यप्रदेशातील एकाला अटक
- रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सात दुचाकी पेटवल्या; पुण्यातील घटना
- Fire in Vaishali Express : उत्तर प्रदेशात 24 तासांत दुसऱ्यांदा 'द बर्निंग ट्रेन'चा थरार! वैशाली सुपरफास्ट एक्स्प्रेसला आग, पाहा व्हिडिओ