पुणे :गेल्या काही दिवसांपासून मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी नाटक येत आहेत. 'पाच फुटाचा बच्चन' या मराठी नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात पार पडला आहे. रोम रोम रंगमंच आणि ऑर्फियस स्टुडिओ यांच्या वतीने मराठी रंगभूमीवर नव्याने आलेल्या या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
पाच फुटाचा बच्चनचा पहिला प्रयोग : पाच फुटाचा बच्चन या नाटकाचे लेखन कौस्तुभ रमेश देशपाडे यांनी तर श्रुती मधुदीप यांनी दिग्दर्शन केले आहे. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला यशवंतराव चव्हाण नाटय सभागृहात सर्वसामान्य रसिकांसह अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती. सुनील सुकथनकर, शिल्पा बल्लाळ, अमोल देशमुख यासारख्या चित्रपट-नाटयक्षेत्रातील मंडळींसोबतच महावीर जोंधळे, इंदूमती जोंधळे, श्रुती तांबे, सुचेता घोरपडे, प्रमोद मुजूमदार, मोहन देस अशी साहित्यिक मंडळी आणि अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी, पत्रकार, प्राध्यापक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर्स हे नाटक पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
मनापासून साद घालणारे नाटक :नाटकाचा आशय हा समकालीन वास्तव मांडणारा असून त्याची भाषा आणि सादरीकरण सर्वसामान्य रसिकाला आवडेल असे आहे. शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि शहरी भागातील जनतेपासून ग्रामीण भागापर्यंत सर्वांना मनापासून साद घालणारे हे नाटक आहे. लेखन, अभिनय, संगीत, प्रकाशयोजना तसेच वेशभूषा या सर्वच बाबतीत हे नाटक दर्जेदार आहे. समाजभान जागृत आणि व्यापक करणारे खरीखुरी संत परंपरा उलगडणारे हे नाटक केवळ पुण्या-मुंबईतील प्रेक्षकांपुरते मर्यादित न राहता राज्यातील अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे मत यावेळी नाटक पाहण्यासाठी आलेल्या जाणकारांनी व्यक्त केले.