महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा जन्म घ्यावासा वाटतो – बाबासाहेब पुरंदरे

जगप्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्त पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, भारतीय जनता पक्षाचे आमदार व माजी मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

Babasaheb Purandare latest news
लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा जन्म घ्यावासा वाटतो

By

Published : Aug 14, 2021, 6:30 PM IST

पुणे -शिवाजी महाराजांची गोडी वडीलांमुळे लागली. अनेक मित्रांच्या साथीने ती वाढली आणि ती जोपासली. वेड लागल्याशिवाय इतिहास कळत नाही. मलाही शिवाजी महाराजांचे वेड लागले. सहजगत्या हे सगळे झाले. मी पुजारी किंवा गुरव नाही. त्यांची बुद्धिमत्ता, पराक्रम, कार्य मला भुरळ घालते. मी भारावून जातो. त्यांची राष्ट्रनिर्मिती, स्वराज्य निर्मितीची भावना खूप मोलाची आहे. हे राज्य आमचे आहे येथे तुम्हाला भलतेसलते काही करू देणार नाही, असे त्यांनी बजावले, असे उद्गार काढतानाच लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा इथेच जन्म घ्यावा, असे वाटते, असे उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज येथे काढले. जगप्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्त पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, भारतीय जनता पक्षाचे आमदार व माजी मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सत्कार सोहोळ्याला उत्तर देताना बाबासाहेब पुरंदरे बोलत होते.

'दीनानाथ मंगेशकर यांच्यापासून आमची ओळख' -

जगात केवळ पाच किंवा सहाच लोकांना मी ‘अरेतुरे’ करतो, त्यात आशा भोसले आहेत. मंगेशकर कुटुंबातील सगळी भावंडे मला प्रिय आहेत. लतादीदींनी एकदा विचारले, तुम्हाला कोणाचा आवाज आवडतो, तेव्हा पंचाईत झाली. मग सांगितले कपबश्यांचा आवाज आवडतो. त्यांच्याबरोबर जिव्हाळ्याचे नाते होते. मनाचे औदार्य असणारे मंगेशकर कुटुंब आहे. ते कुटुंब म्हणजे एक संस्कृती, विचार आहे. दीनानाथ मंगेशकर यांच्यापासून आमची ओळख आहे. ७५ वर्षांचा त्यांचा माझा स्नेह आहे, असेही ते म्हणाले.

'आशा भोसले यांच्यावर आपण एक लेख लिहिणार' -

पुरंदरे यांनी आशा भोसले यांच्यावर आपण एक लेख लिहिणार असल्याचेही म्हटले. 'आयुष्यात प्रेम करायला शिका. माणसाने आयुष्ट हसत खेळत आणि विनोदबुद्धी जागृती ठेवत जगले पाहिजे. मात्र, ही विनोदबुद्धी उपजत असावी लागते. कोणाचा विद्वेष किंवा मत्सर आपण करता कामा नये. प्रेमाने राहायला, प्रेमाने जगायला शिकले पाहिजे. जीवनात मला मंगेशकर, ठाकरे कुटुंबियांचा स्नेह लाभला, गजाननराव मेहेंदळे यांची मदत झाली. जीवनात मी आनंदी, संतुष्ट, तृप्त, सुखी आहे. लोकांकडून मिळणारे हे प्रेम पहिले की पुन्हा एकदा इथे जन्माला यावे, असे वाटते,” असेही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा - विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! आजपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details