पुणे - कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काहींना फायदा झाला. असाच फायदा भोरमधील संदीप शेटे या शेतकऱ्याला झाला आहे. त्यांनी आपल्या शेतात 'लॉकडाऊन पपई' पिकवली आहे. पपईच्या या आगळ्यावेगळ्या नावामुळे शेटे यांना फायदा झाला आहे.
शेतकऱ्याने पपईला लॉकडाऊन पपई नाव दिले पपईचे केले नामकरण -
कोरोनामुळे जेव्हा सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आला तेव्हा प्रत्येकजण घरी बसून होता. या वेळेचा उपयोग करून घेण्यासाठी संदीप शेटे यांनी कुटुंबियांच्या मदतीने 'तैवान 786' जातीच्या पपईची लागवड केली. लॉकडाऊन काळात पपईची लागवड केली म्हणून त्यांनी पपईला 'लॉकडाऊन' असे नाव दिले आहे.
सेंद्रिय पद्धतीने घेतले उत्पादन -
लॉकडाऊन पपईची लागवड ही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करण्यात आली आहे. शेतात कोणतेही रासायनिक खत किंवा औषधे वापरलेली नाहीत. त्यामुळेच पपईचा आकार आणि गुणवत्ता अतिशय उच्च दर्जाची आहे. त्यामुळे पपईला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती शेतकरी संदीप शेटे यांनी दिली.
असाच भाव मिळाला तर मोठ्या प्रमाणात होणार फायदा -
गेल्या दोन महिन्यांपासून शेटे यांच्या शेतातील पपई बाजरात विक्रीसाठी जात आहे. लॉकडाऊन पपईला चांगली मागणी मिळत आहे. अशीच मागणी आणि भाव पुढे मिळत राहिला तर, अडीच ते 3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी आशा शेटे यांनी व्यक्त केली.
अंतर पिकांना झालेला खर्च पूर्ण मिळाला -
लॉकडाऊन पपई बरोबर शेटे यांनी अंतर पिकेही लावली होती. यामध्ये काकडी, भुईमूग, हरभरा, स्ट्रॉबेरीचा समावेश होता. लॉकडाऊनमध्ये सर्व कुटुंबियांनी एकत्रित येऊन यासाठी मेहनत घेतली. या अंतर पिकांवर झालेला खर्च पूर्णपणे मिळाला आहे.