पुणे -कोरोनामुळे शहरात कडक निर्बंध असताना गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. खून, खुनाचा प्रयत्न, घरफोड्या यासारखे गंभीर गुन्हे सातत्याने घडताना दिसत आहेत. मागील पाच दिवसात शहराच्या वेगवेगळ्या भागात आठ जणांचे खून झाले आहेत. सिंहगड, फरासखाना, लष्कर, वारजे, मार्केटयार्ड आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.
चिंताजनक! पुण्यात पाच दिवसात खुनाच्या आठ घटना
लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी (9 मे) हद्दीत हनुमंत शिंदे (वय 38) या व्यक्तीने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे (वय 28) आणि शिवतेज हनुमंत शिंदे (वय 1 वर्ष) यांची हत्या केली होती. यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (9 मे) हद्दीत हनुमंत शिंदे (वय 38) या व्यक्तीने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे (वय 28) आणि शिवतेज हनुमंत शिंदे (वय 1) यांची हत्या केली होती. यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 मे रोजी सराईत गुन्हेगाराने एका पोलीस हवालदाराचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला. याप्रकरणी तडीपार गुन्हेगार प्रवीण महाजन या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. याच दिवशी फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधवार पेठेत देहविक्री करणाऱ्या एका महिलेचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. यातील आरोपीलाही पोलिसांनी अटक केली.
9 मेला वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका चोरट्याने पोलीस निरीक्षकाच्या आईचा निर्घृण खून केला. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशात पळून जाण्याचा तयारीत असणाऱ्या आरोपी अफसर अस्लम अली (वय 19) याला अटक केली. तर 6 मे रोजी लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इस्माईल शेख या ज्येष्ठ व्यक्तीचा खून झाला. तपासादरम्यान पोलिसांनी मोहम्मद आझाद सुक्कासाब शाह (वय 21) याला अटक केली. नशा करण्यास विरोध केल्यामुळे त्याने हा खून केल्याची कबुली दिली.
याशिवाय सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी चार ते पाच जणांच्या टोळक्यावर सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून बहिणीच्या 3 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडवून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
दरम्यान, मागील संपूर्ण महिन्यात शहरात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या परिस्थितीतही अवघ्या पाच दिवसात खुनाच्या आठ घटना उघडकीस आल्याने संचारबंदीतील पोलिसिंगवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.