पुणे -लोणावळा परिसरात अंधश्रद्धेपायी आठ महिन्यांच्या गरोदर महिलेला आपला जीव गमवावा लागला. ही घटना शिलिंब गावात घडली असून याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात महिलेच्या सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली बिडकर असे मृत्यू झालेल्या गरोदर महिलेचे नाव आहे.
माहिती देताना अंनिसच्या शहाराध्यक्षा नंदिनी जाधव हेही वाचा -दोन महिन्यांच्या चिमुकलीला उघड्यावर सोडून आई-वडील पसार
मृत्यू झालेल्या दिपालीच्या भावाने दिली तक्रार
या प्रकरणी दिपालीचा भाऊ संतोष मगर याने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एप्रिल महिन्यात दिपालीचा विवाह महेश बिडकरबरोबर झाला होता. त्यानंतर दिपालीचा पती महेश, सासू जिजाबाई, सासरे रघुनाथ बिडकर, दिर मोहन बिडकर, जाऊ बकुळा बिडकर यांनी माहेरहून पैसे आणि विविध वस्तू आणण्याचा दिपालीकडे तगादा लावला होता. दिपालीला तिचा पती देखील वारंवार मारहाण करत होता. ही बाब दिपालीने आईला सांगितली होती. मात्र, नंतर देऊ असे सांगून तिला पुन्हा सासरी पाठविण्यात आले.
अचानक त्रास सुरू झाल्याने दवाखान्याऐवजी नेले मांत्रिकाकडे
सासरी गेल्यानंतर 8 महिन्याच्या गरोदर दिपालीला अचानक त्रास होऊ लागल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी सासरच्या लोकांनी मांत्रिकाला बोलावले. बाहेरची बाधा झाली असल्याचे सांगून दिपालीला सासरच्या लोकांनी दवाखान्यात घेऊन जाण्यास नकार दिला. त्यानंतर सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दिपालीच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने पुन्हा मांत्रिकाला बोलविण्यात आले. त्यावेळी लिंबू उतरवून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. तरी देखील दिपाली शुद्धीवर न आल्याने तिला उपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आले. तोपर्यंत दिपाली आणि पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा -पिंपरी-चिंचवड : नाईट कर्फ्यूदरम्यान नियम मोडणाऱ्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद