महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजबच.. पुण्यातील ७८ वर्षीय 'या' महिलेने आयुष्यात एकदाही वीज वापरलीच नाही

साधी राहणी उच्च विचारसरणी याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे डॉ. हेमा साने. पर्यावरणाविषयी बोलणारे अनेकजण असतात, लिहिणारेही अनेकजण असतात पण जेव्हा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा मागे हटतात, अशा सर्वांसाठी डॉ. हेमा साने यांचे आयुष्य म्हणजे मूर्तीमंत उदाहरण आहे.

डॉ. हेमा साने

By

Published : May 8, 2019, 12:16 PM IST

पुणे- विज नसेल तर पुण्यासारख्या शहरात तुम्ही राहू शकाल का? खरं तर हा विचारही करवत नाही. पण पुण्यासारख्या शहरात गजबजलेल्या अप्पा बळवंत चौकात राहणाऱ्या डॉ. हेमा साने यांनी आयुष्यात एकदाही विजेचा वापर केला नाही. सध्या त्यांचे वय आहे 78 वर्षे. तांबडी जोगेश्वरी मंदिराशेजारील बोळात जुन्या आणि जीर्ण वातावरणात झाडांच्या, पक्षांच्या सानिध्यात त्या स्वखुशीने राहतात. 121 बुधवार पेठ हा त्यांचा पत्ता..

जोगेश्वरी मंदिरापासून लक्ष्मी रस्त्याकडे जाण्याऱ्या रस्त्यावर जुने पिंपळाचे झाड आहे. या झाडाखाली जुना लाकडी वाडा आहे. या वाड्यात प्रवेश करण्यासाठी तसाच जुना लाकडी दरवाजा आहे. या दरवाजावरच '121 बुधवार पेठ' हे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. हा दरवाजा उघडताच आपण एखाद्या जंगलात आलो की काय, असा भास होतो. कारण दरवाजा उघडताच नजरेस पडतात ती झाड झुडपं, वेली, पालापाचोळा, पक्षांचा किलबीलाट, त्यांची घरटी. या सर्वांच्या मध्यातून निघालेली एक पायवाट.. जी काही अंतरावर असलेल्या जुन्या काळातील घराजवळ जाऊन थांबते. असे वाटते वर्षानुवर्षे या घरात कुणी राहत नसेल.

या घराची बहुतांश लाकडं कुजलेली, सर्व बाजूने घराची पडझड झालेली, लाकडं कुजलेली, जागोजागी कोळ्याचे जाळे लटकलेले, मुंग्यांच्या रांगा दिसतात. या घराच्या दारात निवांतपणे पहुडलेला कुत्रा तर घरातील लाकडी पलंगावर विसावलेली मांजर..असं हे चित्र पाहून इथं कुणी राहत असेल असा विचारही मनात येणार नाही..पण याच घरात राहतात डॉ. हेमा साने..

वनस्पती शास्त्राच्या अभ्यासक डॉ. हेमा साने यांनी त्यांच्या आयुष्यात आजवर कधीच वीज वापरलीच नाही. पुण्यातील गरवारे महाविद्यालयात त्या वनस्पतीशास्त्राच्या प्रोफेसर होत्या. पर्यावरण संरक्षण आणि उर्जा बचतीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पीत केले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, असे असूनही सर्व प्रकारच्या प्रसिद्धीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात त्या एकट्याच राहत आहेत. असे राहण्यातच त्यांना आनंद वाटतो.

आजवर तुम्ही एकदाही वीज वापरली नाही असे विचारले असता..

त्या म्हणतात, आजवर मला कधी विजेची गरज भासलीच नाही. भेटायला येणारी लोक मला विचारतात की, तुम्ही विजेशिवाय कसं जगू शकता? तेव्हा मी त्यांना प्रतिप्रश्न करते की, तुम्ही विजेबरोबर कसं जगता. आजवर मला कधी विजेची गरजच भासली नाही. त्यामुळे मला त्याबद्दल काहीच वाटत नाही. या ठिकाणी राहण्यात मला आनंद वाटतो. येथे राहणारे पशु-पक्षी माझे मित्र आहेत. ते माझ्याशी संवाद साधतात. अनेकजण मला ही जागा विकण्याचा सल्ला देतात, पण जागा विकली तर या झाडांचं, या पक्षाचं काय होईल हा प्रश्न मला पडतो. मला त्यांच्यासोबतच रहायचं आहे. त्यामुळे जागा विकण्याचा प्रश्नही माझ्या मनात येत नाही.

डॉ. हेमा साने
साधी राहणी उच्च विचारसरणी याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे डॉ. हेमा साने. पर्यावरणाविषयी बोलणारे अनेकजण असतात, लिहिणारेही अनेकजण असतात पण जेव्हा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा मागे हटतात, अशा सर्वांसाठी डॉ. हेमा साने यांचे आयुष्य म्हणजे मूर्तीमंत उदाहरण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details