परभणी- जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी विधानसभा मतदारसंघासाठी आज(सोमवार) मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. आज दिवसभरात जवळपास 13 लाख 99 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. दरम्यान, परभणी शहरातील शारदा महाविद्यालय या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या ठिकाणी पावसामुळे एखाद-दुसरा मतदार येऊ लागला आहे. परंतु मतदारांमध्ये तेवढाच उत्साह असून, दिवसभर मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -वांद्रे पूर्वेत मतदानाला सुरुवात; 11 वाजता ठाकरे कुटुंबीय करणार येथे मतदान
परभणी जिल्ह्यात 1178 मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये 56 मतदान केंद्रे हे संवेदनशील आहेत. त्यांच्यावर पोलिसांचा तसेच जिल्हा प्रशासनाचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. दरम्यान, चार मतदान केंद्रे हे आदर्श मतदान केंद्र म्हणून असून, चार मतदान केंद्रे सखी मतदान केंद्र असतील. या दोन्ही मतदान केंद्रांवर मतदारांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाणार आहे. जेणेकरून लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करता येईल, हा उद्देश यामागे जिल्हा प्रशासनाचा आहे.