महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत अवकाळी पाऊस; गहू, ज्वारीसह संत्रा आंबा फळबागांना फटका

परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये देखील रिमझिम पाऊस पडला. या पावसापूर्वी काही काळ वादळी वारे वाहू लागल्याने ज्यामध्ये गहू, ज्वारी आणि भाजीपाल्यासारखी पिके आडवी झाली. वादळी वाऱ्यामुळे संत्रा आणि फुलोऱ्यात आलेल्या आंब्याचे मात्र मोठे नुकसान झाले.

parbhani
परभणीत अवकाळी पाऊस; गहू, ज्वारीसह संत्रा आंबा फळबागांना फटका

By

Published : Mar 18, 2020, 7:37 AM IST

परभणी -शहरात मंगळवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. मध्यम स्वरूपाच्या या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. परंतू ग्रामीण भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा या पिकांसह संत्रा आणि आंब्याच्या फळबागांनाही याचा फटका बसला आहे. ९ मार्चलाही अवकाळी पावसाने अनेक भागातील पिके आडवी झाली आहेत. त्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नाहीत, तोच पुन्हा अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा -परभणीतील 'त्या' 23 पैकी एकालाही कोरोनाची लागण नाही

गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होत आहे. असे असले तरी दिवसा 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असणारे तापमान संध्याकाळी मात्र 12 ते 14 अंशावर येऊ लागले आहे. त्यामुळे 'दिवसा उष्णता आणि रात्रीच्या वेळी थंडी', असे विचित्र वातावरण गेल्या काही दिवसात निर्माण झाले आहे. बदलत्या वातावरणामुळे रोगराई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच मध्यरात्री परभणी शहर तसेच तालुक्यातील खानापूर, कारेगाव, असोला, पांढरी, सिंगणापूर, बाभळी, जाम, बोरवंड, ब्राह्मणगाव या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा -कोरोना फटका: धास्तीने शहरातील नागरिक गावाकडे...

याशिवाय परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये देखील रिमझिम पाऊस पडला. या पावसापूर्वी काही काळ वादळी वारे वाहू लागल्याने ज्यामध्ये गहू, ज्वारी आणि भाजीपाल्यासारखी पिके आडवी झाली. वादळी वाऱ्यामुळे संत्रा आणि फुलोऱ्यात आलेल्या आंब्याचे मात्र मोठे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात फुलोरा गळून पडल्याने त्याचा परिणाम आंब्यावर होणार आहे. दरम्यान, ९ मार्चला देखील पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. त्याच्या पंचनाम्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रभाव असल्याने शासकीय यंत्रणा त्यात गुंतली आहे. त्यामुळे पंचनामे होतील की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे देखील तितकेच लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details