महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या घरात

परभणी जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती मागील तीन आठवड्यापासून नाजूक होत आहे. बुधवारी जिल्ह्यात एकाच दिवशी 25 रुग्ण आढळल्याने जिल्हावासियांना धक्का बसला. त्यानंतर पुन्हा गुरुवारीही जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे.

parbhani corona update
परभणीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या घरात

By

Published : Jul 10, 2020, 12:55 PM IST

परभणी -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. कोरोनाबधितांंची संख्या आता दोनशेच्या घरात पोहोचली आहे. बुुधवारी 25 तर गुरुवारी 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात परभणी, सेलू शहरातील आणि जिंतूर तालुक्यातील रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यानुसार आता जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता 194 झाली आहे.

परभणी जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती मागील तीन आठवड्यापासून नाजूक होत आहे. बुधवारी जिल्ह्यात एकाच दिवशी 25 रुग्ण आढळल्याने जिल्हावासीयांना धक्का बसला. त्यानंतर पुन्हा गुरुवारीही जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. जिंतूर शहरातील वरूड वेस तसेच सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील 45 वर्षीय पुरुष, परभणी शहरातील गांधी पार्क भागातील 33 वर्षीय पुरुष आणि सोनार गल्ली भागातील एका 60 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पोस्ट कॉलनीतील 1 आणि जागृती कॉलनीतील 1 रुग्ण कोरोनाबाधित झाला आहे.

शिवाय गुरुवारी पुन्हा रात्री उशिरा 11 वाजता आलेल्या अहवालात परभणी शहरातील परसावत नगर भागातील 1, जवाहर कॉलनी 3 आणि काद्राबाद प्लॉट भागातील 3 असे एकूण 7 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 111 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीला उर्वरित 78 आणि मुंबईत कोरोनाबाधित निघालेले आणि येथे उपचार घेणारे 2 असे 80 कोरोना रुग्ण जिल्हा रुग्णालयाच्या संक्रमित कक्षात उपचार घेत आहेत.

दरम्यान, गुरुवारी आढळलेल्या रुग्णांपैकी एक परभणी शहरात सोनार गल्ली येथील महिला एका खासगी दवाखान्यात कामास होती. तर गांधी पार्क भागातील 33 वर्षीय पुरुष हा जिल्हा परिषदेच्या रोहयो विभागातील कंत्राटी कर्मचारी आहे. हा कर्मचारी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आढळलेल्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य 17 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. मात्र, सर्व कर्मचाऱ्यांचे नमुने निगेटिव्ह आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन पास देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यासच कोरोना झाल्याने दोन दिवसांपासून जिल्हा कचेरीत ऑनलाईन पास देण्यासाठीची खिडकी बंद आहे. गुरुवारीही देखील ही सुविधा बंद होती.

आनंदाची बाब म्हणजे परभणी शहरातील चार रुग्ण गुरुवारी कोरोनामुक्त झाले. त्यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. रामकृष्णनगर भागातील 56 वर्षीय महिला, 20 वर्षीय युवती आणि 21 वर्षीय युवक असे 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्याच प्रमाणे काद्राबाद प्लॉट भागातील 21 वर्षीय युवक कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

"तो विवाहसोहळा गंगाखेडकरांना भोवला"

लॉकडाऊनचा सव्वा महिना कोरोनामुक्त असलेल्या गंगाखेड शहरात एका व्यापाऱ्याच्या मुलाचा विवाह सोहळा चांगलाच भोवला. या विवाह सोहळ्यामुळे व्यापाऱ्याच्या घरातील 7 आणि अन्य 4 जणांना कोरोनाची लागण झाली. व्यापाऱ्याच्या मुलाचा विवाह सोहळा 25 जून रोजी लातूर येथे पार पडला. या सोहळ्यावरून परत आल्यानंतर 3 जुलै रोजी या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील एका 60 वर्षीय महिलेला उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. 6 जुलै रोजी या 60 वर्षीय महिलेसह सेलमोहा येथील एका 55 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर व्यापाऱ्याच्या कुटुंबातील 26 जणांसह इतर 17 असे 43 जणांचे स्वॅब घेण्यात आले. तसेच सेलमोहा येथील महिलेच्या संपर्कातील 20 जणांचे स्वब घेतले होते.

8 जुलै रोजी व्यापाऱ्याच्या कुटुंबातील एका महिलेसह दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापाठोपाठ त्याच दिवशी रात्री उशिरा मिळालेल्या यादीत याच कुटुंबातील 38, 47 आणि 24 वर्षीय महिला तसेच 32 व 38 वर्षीय पुरुष असे 5 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्याचप्रमाणे घरकाम करणाऱ्या 62 वर्षीय महिलेसह एक 46 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांत गंगाखेड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 झाली. त्यामुळे पूजा मंगल कार्यालयासह वेताळ गल्ली, नगरेश्वर गल्ली, व्यंकटेशनगर व हाटकर गल्ली हा भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाला. तर संपूर्ण गंगाखेड शहर आणि तीन किलोमीटर परिसरात 3 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details