महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महापोर्टल'च्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार, परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

'महापोर्टल'च्या परीक्षेदरम्यान कॉपी करताना एका परीक्षार्थीला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या विरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या परीक्षार्थीला पोलिसांनी आज (मंगळवारी) न्यायालयात हजर केले. परिक्षेत कॉपी केल्याप्रकरणी त्याला न्यायालयानी त्याला कोठडी सुनावली आहे.

parbhani
'महापोर्टल'च्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार

By

Published : Dec 3, 2019, 10:34 PM IST

परभणी - 'महापोर्टल'च्या माध्यमातून शासकीय सेवांची भरतीप्रक्रिया घ्यावी की नाही, यावरून नवीन सरकारमध्ये संभ्रम आहे. यातच परभणी जवळील एका परीक्षा केंद्रावर 'महापोर्टल'च्या वतीने ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या परीक्षेत चक्क कॉपीचा प्रकार घडला आहे. एका परीक्षार्थ्याने सोबत नेलेल्या मोबाईलवरून बाहेर संपर्क साधून कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याने, त्याला पर्यवेक्षकांनी रंगेहात पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

'महापोर्टल'च्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार

परभणी शहरालगत धर्मपुरी येथील ज्ञानसाधना औषध निर्माण महाविद्यालयात हा प्रकार घडला. याठिकाणी महापोर्टलद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षांचे केंद्र आहे. या केंद्रावर २ डिसेंबरला शासनाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा घेण्यात येत होती. परीक्षा ऑनलाईन असल्याने परीक्षा केंद्रात मोबाईल व इतर साहित्य घेऊन जाण्यास बंदी होती. या ठिकाणी परीक्षार्थी सज्जनसिंग हरसिंग जारवाल (रा. जोरवाडी औरंगाबाद) हा कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा देण्यासाठी आला होता. परीक्षा केंद्रात जाताना त्याने मोबाईल लपून सोबत नेला. नंतर तो मोबाईलच्या माध्यमातून कानात लावलेल्या ब्लूटुथद्वारे बाहेर बसलेल्या सहकार्याला प्रश्न विचारून त्याच्याकडून उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, त्याचवेळी तो रंगेहात पकडला गेला. परीक्षा केंद्रात पर्यवेक्षक असलेल्या संतोष अवतारे यांनी त्याला पकडून त्याच्या विरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. या परीक्षार्थीला पोलिसांनी आज (मंगळवारी) न्यायालयात हजर केले. परिक्षेत कॉपी केल्याप्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी करत आहेत.

हेही वाचा - शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राजू शेट्टींना कृषिमंत्री करा- रसिका ढगे

महापोर्टल' वादाच्या भोवऱ्यात -
दरम्यान, मागील भाजप सरकारने नोकर भरतीसाठी महापोर्टल सेवा सुरू केली. मात्र, या सेवेत पारदर्शकता नसल्याची तक्रार स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी केली होती. प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या लाखो युवकांना ही सेवा मदत ठरण्याऐवजी अडचण ठरत असल्याचा आरोप झाला. त्यामुळे ही सेवा बंद करून पुर्वीप्रमाणेच परीक्षा पद्धत ठेवावी, अशी मागणी नुकतीच खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा - जिल्हा हिवताप कार्यालयातील संघर्ष समितीचे निदर्शन; परिपत्रकाची केली होळी

ABOUT THE AUTHOR

...view details